पुणे, १५ मार्च २०२६ : मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) तर्फे अस्थी आणि सांधे आरोग्य या विषयावर राष्ट्रीय रुग्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले. कॅम्प येथील द पूना क्लबमध्ये झालेल्या या परिषदेत रुग्ण, त्यांचे पालक व कुटुंबीय (केअरगिव्हर्स) तसेच डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जागरूकता, शिक्षण आणि रुग्ण सक्षमीकरणासाठी हा दिवस समर्पित करण्यात आला होता.
या परिषदेला प्रमुख पाहुण्या म्हणून एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. वैशाली देशमुख उपस्थित होत्या. त्यांनी सांधेदुखी आणि संबंधित विकार टाळण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य, योग्य जीवनशैली आणि नियंत्रित वजन व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेत विविध तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. नचिकेत कुलकर्णी, सीआरडीचे संचालक व मुख्य ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. अरविंद चोप्रा, टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील द्रव्यगुण विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. अपूर्वा एम. संगोराम तसेच माईर्सच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रवींदर कौर यांचा समावेश होता.
माईच्या अध्यक्षा दीपा मेहता यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत संधिवातग्रस्त रुग्णांसाठी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. माईच्या सचिव श्रीमती श्वेता कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर माईच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तज्ज्ञांच्या व्याख्यानांमध्ये अस्थी व सांधे आरोग्य, निरोगी सांध्यांसाठी योग्य शरीरबांधा आणि एर्गोनॉमिक्स, तसेच संधिवात नियंत्रणासाठी पारंपरिक भारतीय आहार आणि पोषण यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते तीन प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण. स्व. श्री. पी. सी. नहार ऑरेशन पुरस्कार डॉ. नचिकेत कुलकर्णी यांना, स्व. श्री. हरिभाऊ राठीजी वातविरुद्ध योद्धा पुरस्कार श्रीमती राणी परसनीस यांना, तर सीआरडी वातविरुद्ध पुरस्कार श्री. अरविंद जगताप यांना प्रदान करण्यात आला.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ओपन फोरम सत्रात रुग्णांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधत आपले अनुभव मांडले आणि आवश्यक मार्गदर्शन घेतले.





