BIG NEWS : जेजुरी–सासवड मार्गावर भीषण दुर्घटना; दिंडीतील ट्रकखाली तीन वारकऱ्यांचा मृत्यू; कडेला चालत असताना भरधाव ट्रकची धडक; वारी बंदोबस्तावर गंभीर प्रश्नचिन्ह

By: Editor_Pratik

On: Monday, July 13, 2026 4:38 AM

Google News
Follow Us

प्रतिक गंगणे । पुणे

जेजुरी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर दुर्दैवाची छाया पडली असून जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे वारी मार्गावर शोककळा पसरली असून संपूर्ण वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराशी संबंधित दिंडी आषाढी वारीसाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत होती. जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरातून दिंडी मार्गक्रमण करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

या भीषण अपघातात राजेश्री शंकर भोसले (कसबे डिग्रज, सांगली), माधवी राजाराम सलगरे (मळगाव, मिरज) आणि नंदा पवार (कोल्हापूर) या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या तिघीही विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे दिंडीतील वारकरी आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात अन्य सहा वारकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून जखमींवर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेतली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा आणि पुढील तपास सुरू केला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारी महाराष्ट्राची शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. अशा पवित्र वारीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोक व्यक्त केला जात असून मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

या अपघातानंतर वारी मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालखी मार्गावर जड वाहनांच्या हालचालींवर अधिक प्रभावी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन, दिंड्यांच्या सुरक्षित मार्गक्रमणासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची मागणी वारकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत असून अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now