महाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’; डॉ. नरेंद्र दाभोलकर

By: Editor_Manas

On: Thursday, April 30, 2026 3:40 PM

Google News
Follow Us

पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने समाजातील बदलत्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक आव्हानांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘लोकशाही संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला यांच्या नावाने पाच विचार अभियानाचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. युवकांना समाजपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवत विचार, संवाद आणि कृती यांची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

येत्या शुक्रवारी (ता. १ मे) सायंकाळी ५ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी, विधिज्ञ अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे व हमीद दाभोलकर यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार असून, विविध समकालीन विषयांवर त्यांचे मार्गदर्शन युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली.

शिवराज मोरे म्हणाले, “अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक विचारांविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अभियान’, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समतेचा विचार समाजात अधिक दृढ करण्यासाठी ‘गोविंद पानसरे अभियान’, विचारस्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि अभिव्यक्तीचा अधिकार अधिक बळकट करण्यासाठी ‘एम. एम. कलबुर्गी अभियान’, सत्याधारित पत्रकारिता, मीडिया साक्षरता आणि फेक न्यूजविरोधातील जनजागृतीसाठी ‘गौरी लंकेश अभियान’ व विद्यार्थी सन्मान, शिक्षणातील समानता आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देण्यासाठी ‘रोहित वेमुला अभियान’ हाती घेण्यात आले असून, या पाचही अभियानाचा संयुक्त उद्घाटन सोहळा यावेळी होणार आहे.”

ही अभियाने केवळ उद्घोषणांपुरती मर्यादित न राहता राज्यभरातील शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, शहरी वस्त्या आणि युवक संघटनांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. चर्चासत्रे, संवाद मालिका, प्रशिक्षण कार्यशाळा, सामाजिक जनजागृती मोहिमा आणि युवक नेतृत्व विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. युवकांनी विवेक, विज्ञान, समता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारावर नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत सक्रिय भूमिका घ्यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. राज्यात वैचारिक प्रगल्भता, सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये संविधाननिष्ठ नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल.”

“आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात अंधश्रद्धा, समाजातील वाढते ध्रुवीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्माण होणारे प्रश्न, शिक्षणातील विषमता आणि फेक न्यूजच्या माध्यमातून होणारी दिशाभूल ही गंभीर आव्हाने समाजासमोर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर युवकांनी केवळ प्रेक्षक न राहता विचारांचे वाहक, परिवर्तनाचे नेतृत्व आणि समाजजागृतीचे माध्यम बनावे, या व्यापक उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना आकाराला आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 30, 2026

April 30, 2026

April 30, 2026

April 30, 2026

April 30, 2026

April 30, 2026