The Inner Vybes : सोशल मीडियावर सध्या ‘द इनर व्हायब’ आणि ‘द इनर सर्कल’ या नावाने फिरणाऱ्या एका संदेशामुळे तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘स्ट्रेंजरसोबत मूव्ही डेट, ब्लाइंड डेट, पार्टी, रोड ट्रिप’ अशा आकर्षक अनुभवांचे आमिष दाखवून नागरिकांकडून आगाऊ पैसे उकळण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संदेशामध्ये ‘लॉन्ग ड्राइव्ह विथ लंच’, ‘लक्झरी स्टे’, महिला गटातील व्यक्तीच्या ताब्यात कार, तसेच विविध शहरांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यासह दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आदी शहरांची नावे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, लंचसह सर्व खर्च मिळून केवळ ३ हजार रुपये, तसेच कोणतेही छुपे शुल्क नसल्याचा दावा संदेशात करण्यात आला आहे.
विश्वास निर्माण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध शहरांमध्ये मोफत भेटी आयोजित केल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतरच पैसे भरून सदस्यत्व घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृतता आणि प्रत्यक्षात अशा सेवा अस्तित्वात आहेत की नाहीत, याबाबत कोणतीही स्वतंत्र खात्री या संदेशातून होत नाही.
‘पहिल्यांदा महिला गटाची बुकिंग, त्यानंतर पुरुषांची बुकिंग’, ‘पार्टी किंवा ट्रिप रद्द होण्याची शक्यता जवळपास शून्य’ आणि ‘सर्व खर्च समान पद्धतीने विभागला जातो’ अशा शब्दांचा वापर करून संभाव्य ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संदेशाच्या शेवटी व्हॉट्सॲप क्रमांकावर बुकिंग व चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, आगाऊ पैसे भरण्यापूर्वी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिरातींमधून वैयक्तिक माहिती, ओळखपत्रांची छायाचित्रे, बँक खात्याची माहिती किंवा आगाऊ रक्कम मागितली जाऊ शकते.
‘आधी पैसे, नंतर भेट’ असेल तर सावधान!
अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेला आगाऊ पैसे देण्यापूर्वी संबंधित संस्थेची नोंदणी, कार्यालयाचा प्रत्यक्ष पत्ता, आयोजकांची ओळख, मागील कार्यक्रमांचे विश्वसनीय पुरावे आणि पैसे परत करण्याच्या अटी तपासणे आवश्यक आहे. केवळ सोशल मीडियावरील पोस्ट, आकर्षक छायाचित्रे किंवा व्हॉट्सॲपवरील आश्वासनांवर विश्वास ठेवू नये.
या संदेशामध्ये करण्यात आलेले दावे फसवणुकीचे असू शकतात, त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची चौकशी करून सत्यता स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.





