पुणे : आंबेगाव परिसरात गावठी अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून तब्बल १ लाख २० हजार ५०० रुपये किमतीची तीन गावठी अग्निशस्त्रे आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.
दिनांक १० ऑगस्ट रोजी आंबेगाव पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझर तलावाशेजारील मोकळ्या जागेत, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द येथे तीन व्यक्ती थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्रे आहेत. माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांनी संशयित तिघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी अग्निशस्त्रे आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

पोलिसांनी राजन विनोद शहा, अनिल कैलास चौधरी आणि प्रथम अरुण रेणुसे या तिघांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.
अवैध अग्निशस्त्रांविरोधात आंबेगाव पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
अग्निशस्त्रविरोधी कारवाईला वेग देण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जांभुळवाडी परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी अग्निशस्त्रे आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. परिसरात बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर करडी नजर आहे. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
मा. श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर





