महाराष्ट्राची बांधिलकी आसामच्या मदतीला; श्रीमान लेजेंडकडून १२ लाखांची मदत

By: Editor_Pratik

On: Thursday, August 13, 2026 5:48 AM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्राची ओळख केवळ पराक्रम, कष्ट आणि संघर्षाची नाही, तर संकटाच्या काळात माणुसकीसाठी उभे राहण्याचीही आहे. हीच महाराष्ट्राची ‘बांधिलकी’ पुन्हा एकदा देशासमोर आली आहे. आसाममधील भीषण महापुरामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी ‘श्रीमान लेजेंड’ आणि ‘बांधिलकी परिवाराच्या’ माध्यमातून तब्बल १२ लाख रुपयांची मदत उभी करण्यात आली आहे.

श्रीमान लेजेंड हे गेमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ओळखले जाणारे लोकप्रिय गेमिंग यूट्यूबर आहेत. गेमिंग हे त्यांचे प्रमुख क्षेत्र असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या या व्यासपीठाचा उपयोग सामाजिक कार्यासाठीही केला आहे. मनोरंजन आणि गेमिंगपुरते व्यासपीठ मर्यादित न ठेवता गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे.

आसाममधील भीषण महापुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरे, घरातील साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. ही परिस्थिती समोर आल्यानंतर श्रीमान लेजेंड यांनी लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून चॅरिटी सुरू केली. तब्बल आठ तास चाललेल्या या लाइव्ह चॅरिटीमधून १० लाख रुपयांचा निधी जमा झाला. चॅरिटी संपल्यानंतरही मदतीची भावना कायम राहिली. दुसऱ्या दिवशी अनेक चाहते आणि समर्थक स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी आणखी आर्थिक योगदान दिले. या अतिरिक्त योगदानासोबतच श्रीमान लेजेंड यांनी स्वतःकडूनही काही रक्कम जोडली. अशा प्रकारे आसामच्या पूरग्रस्तांसाठीची एकूण मदत १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचली.

ही मदत ‘Sikh Aid’ या संस्थेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचली असून, संस्थेकडून मदतीचे वाटप सुरू झाले आहे. आसाममधील सुमारे २०० पूरग्रस्त कुटुंबांना गाद्या, गॅस शेगड्या, स्वयंपाकाची भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. मदतीचे साहित्य संबंधित भागात पोहोचले असून, संस्थेच्या माध्यमातून त्याचे वितरण सुरू झाले आहे. याशिवाय पूरग्रस्त भागातील एका संपूर्ण गावातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेण्यात आली आहे. या मुलांच्या शालेय शुल्कासोबत गणवेश, स्कूल बॅग आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्याचे कामही संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. त्यामुळे ही मदत केवळ आजच्या संकटापुरती मर्यादित न राहता, मुलांच्या भविष्यासाठीही आधार ठरणार आहे.

आसाममधील नटालीगुरी भागात महापुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली १० घरे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्निर्माण करण्याचे कामही सुरू झाले आहे. या दहा कुटुंबांना नवीन बेड, गाद्या आणि आवश्यक घरगुती वस्तू देण्यात येत आहेत. घरांचे पुनर्निर्माण करून ती पुन्हा राहण्यायोग्य करण्याचे काम संस्थेकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा आपल्या घरात उभे राहण्याची नवी आशा मिळत आहे.

श्रीमान लेजेंड यांचे सामाजिक कार्य केवळ आसामपुरते मर्यादित नाही. कोल्हापूर, सांगली तसेच महाराष्ट्रातील विविध पूरग्रस्त भागांमध्ये आणि महाराष्ट्राबाहेरील पूरग्रस्त भागांमध्येही त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोविडच्या काळात, सैन्यासाठी तसेच गरजू महिला, मुले आणि अनाथाश्रमांसाठीही त्यांनी विविध माध्यमांतून मदत केली आहे. काही वेळा त्यांनी ही मदत कोणताही गाजावाजा न करता केली आहे. मदतीची प्रसिद्धी होण्यापेक्षा ती योग्य गरजूंपर्यंत पोहोचावी, हा त्यामागचा उद्देश राहिला आहे.

श्रीमान लेजेंड यांच्या या कार्यातून प्रेरणा घेत अनेक गेमिंग यूट्यूबर्स आणि स्ट्रीमर्सही सामाजिक मदतीसाठी पुढे येत आहेत. गेमिंगच्या माध्यमातून मिळालेली लोकप्रियता समाजासाठीही उपयोगी ठरू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

आसामसाठीची ही १२ लाखांची मदत केवळ आर्थिक योगदान नाही, तर संकटात सापडलेल्या कुटुंबांना पुन्हा उभे करण्याची ‘बांधिलकी’ आहे. महाराष्ट्राची ही माणुसकीची परंपरा श्रीमान लेजेंड यांनी पुन्हा एकदा देशासमोर आणली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News