पुणे, दि. २० सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी रात्री ११ वाजता येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील श्री गणेशाची आरती करून उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. पोलीस आयुक्तांच्या या अनौपचारिक भेटीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार येरवडा पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विघ्नहर्ता ट्रस्टचे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. गणेशाची आरती झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विविध प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
यावेळी डीजेमुक्त दहीहंडी तसेच ईद-ए-मिलादचा सण शांततामय आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांची सर्वसमावेशक सहमती मिळवून घेतल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अभिनंदन केले. सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, कल्याणीनगर परिसरात ध्वनी प्रदूषणाविरोधात जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येरवडा पोलिसांच्या कार्याचे कौतुक करणारा हस्तलिखित शुभेच्छा संदेश तयार केला होता. हा संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
सामान्य नागरिकांमध्ये सहजपणे मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर कायदेशीर आणि प्रभावी उपाययोजना करणे तसेच नागरिकांचा विश्वास संपादन करून लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याच्या येरवडा पोलिसांच्या कार्यपद्धतीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.
‘नागरिकांचा विश्वास, पोलिसांचा सेवाभाव आणि कायद्याचा सन्मान’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून येरवडा पोलीस ठाण्याची लोकाभिमुख वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छांसह भेटीची सांगता झाली.





