पुणे : दोन दिवसीय ‘ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उदघाटन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांच्याहस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले. दि.८,९ जून रोजी हे अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.श्री ज्योतिष संशोधन केंद्र,अभिजीत प्रतिष्ठान-द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट(मुंबई),द लीला टॅरो(पुणे) या संस्थांनी द प्रेसिडेंट हॉटेल(प्रभात रस्ता) च्या सभागृहात या अधिवेशनाचे आयोजन केले आहे.दि.८ जून रोजी सकाळी नऊ वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
अधिवेशनाचे आयोजक ॲस्ट्रोगुरु डॉ.सौ.ज्योती जोशी यांनी मान्यवरांचे सत्कार केले.या अधिवेशनाचे हे चौथे वर्ष आहे.ज्योतिर्विद श्रीमती रजनी साबदे या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. प्राचार्य ज्योतिर्विद रमणलाल शहा(सातारा), गोविंद कुलकर्णी(राष्ट्रीय अध्यक्ष,अ.भा. ब्राह्मण संघ),आनंद दवे(अध्यक्ष,हिंदू महासंघ),ज्योतिर्विद श्री. आदिनाथ साळवी,ज्योतिर्विद सुनिल पुरोहित,ज्योतिर्विद ॲड.सौ.सुनिता पागे,रेसिपी तज्ज्ञ सौ.मधुरा बाचल हे मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
फलज्योतिष अभ्यास मंडळ (पुणे),आदिशक्ती गुरुकुल, (सासवड),श्री मोहिनीराज ज्योतिष कार्यालय (नंदुरबार),मुळे ज्योतिष व वधु-वर केंद्र (तळेगाव दाभाडे) या संस्था आणि राज्यभरातील ज्योतिष अभ्यासक सहभागी झाले. ज्योतिषविषयक अनेक व्याख्याने अधिवेशनात आयोजित करण्यात आली असून अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
गिरीश चितळे म्हणाले, ‘ ज्योतिष हे हजारो वर्षांची परंपरा असणारे शास्त्र आहे. ग्रहताऱ्यांबद्दलच्या ज्ञानाचा उपयोग ज्योतिषांनी समाजजीवनासाठी केलेला आहे. भविष्य लिहूनच ठेवले असतील आणि तर ते बदलणार नसेल, तर जाणून तरी का घ्यावे, असे वाटू शकते. तसेच अशी अनेक आव्हाने या शास्त्राला येत राहतील. पण, तेही शंकासमाधान करीत राहावे. समाजासाठी योगदान देत राहावे, समाजाला दिशा देण्यासाठी काय करता येईल का, याचा विचार करावा.ज्योतिषांनी आता स्वतःचे मार्केटिंग केले पाहिजे ‘.
मधुरा बाचल म्हणाल्या, ‘ ज्योतिष विद्या ही परंपरागत विद्या आहे. त्याला आता आधुनिक माध्यमांची जोड दिली जात आहे, हेही महत्वाचे आहे. त्यासाठी ज्योती जोशी यांचे उपक्रम उपयुक्त ठरतील.
गोविंद कुलकर्णी म्हणाले, ‘ ज्योतिषांनी उपयोगिता सिद्ध करीत राहावे आणि अचूकता आणण्याचे प्रयत्न करावेत ‘.
आनंद दवे म्हणाले, ‘ ज्योतिष हे शास्त्र आहे, त्यात शंका नाही.ते सिध्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ज्योतिषांनी एकत्रित प्रयत्न करावेत. ज्योतिष सर्व स्तरात जाण्यासाठी प्रयत्न करावेत.आदिनाथ साळवी म्हणाले, ‘ ज्योतिष हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्योतिषाला भवितव्याचा वेध घेता यायला हवा.
सुनील पुरोहित यांनी डेस्टिनी मॅनेजमेंट बाबत मार्गदर्शन केले. सुनीता पागे यांनी ही मार्गदर्शन केले
श्रीमती रजनी साबदे यांनी स्वागत केले.शैलेश पुरोहित यांनी सूत्र संचालन केले.