कोक स्टुडिओ भारतचे गीत ‘बुल्लेया वे’ने बुल्ले शाह यांचा वारसा नवीन पिढीपर्यंत आणला

By: Editor_Manas

On: Friday, April 17, 2026 2:21 PM

Google News
Follow Us

राष्ट्रीय, एप्रिल १७, २०२६: आपल्या चौथ्या सीझनची सुरुवात ‘ऐ अजनबी’ या गीताने गाजवून केल्यानंतर कोक स्टुडिओ भारतने आपले दुसरे गाणे ‘बुल्लेया वे’ प्रदर्शित केले आहे. हे गाणे मानवी जीवनातील सर्वात सखोल सत्यांपैकी एकावर भाष्य करते, ते म्‍हणजे, कधी-कधी सर्वात कठीण प्रवास हा स्वतःच्या अहंकारापासून परतण्याचा असतो.

सुफी कवी बुल्ले शाह आणि त्यांचे मुर्शिद (गुरू) शाह इनायत यांच्या अजरामर कथेने प्रेरित असलेले ‘बुल्लेया वे’ अहंकार, दुरावा आणि माणसाला नम्र करणाऱ्या प्रेमाच्या प्रवासाचा शोध घेते. आपल्या गुरूंच्या प्रती पूर्णपणे समर्पित असलेल्या बुल्ले शाह यांच्या अहंकाराच्या एका क्षणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि गुरूंचे मौन हीच त्यांच्यासाठी शिक्षा ठरते. यानंतर सुरू होतो एक शांत आणि व्याकुळ करणारा विरह, जो बुल्ले शाह यांना स्वतःचा अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. शेवटी, बुल्ले अभिमानाने नव्हे, तर एक साधक म्हणून पूर्ण शरणागती पत्करून परततात. हे गीत अहंकाराकडून शरणागतीकडे आणि विरहाकडून मिलनाकडील प्रवास अत्यंत भावूक आणि वास्तववादी पद्धतीने सादर करते.

जालंधरमधील एक गिरणी कामगार अशोक मस्कैन यांची ओळख या गाण्यातून करून देण्यात आली आहे. त्यांचा नैसर्गिक आणि रांगडा आवाज ‘बुल्लेया वे’मध्ये प्रामाणिकपणा आणि वास्तववादी भावना ओततो. त्यांच्यासोबत दोन वेगवेगळ्या संगीत विश्वातील कलाकार मधुर शर्मा आणि स्वरित शुक्ल सामील झाले आहेत. मधुर या गाण्यात शांत भावनिकता आणतात आणि विरहातील तणाव संयमाने मांडतात, तर स्वरित यांनी अशा किमान संगीत रचनेची निर्मिती केली आहे, ज्यामुळे कथेचा मूळ गाभा केंद्रस्थानी राहतो. थोडक्यात सांगायचे तर, ‘बुल्लेया वे’ गाणे स्वतःला हरवून बसण्याबद्दल आहे, पराजयामुळे नव्हे, तर नम्रतेमुळे; कारण कधी-कधी तिथूनच खऱ्या अर्थाने प्रेम आणि श्रद्धेची सुरुवात होते.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाचे आयएमएक्‍स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्‍स्‍पीरियन्‍स) प्रमुख शंतनू गांगणे म्हणाले, “भारतातील संगीताने नेहमी स्व-शोधाच्या कथा जपल्या आहेत. ‘बुल्लेया वे’च्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारत अशा प्रवासाला सादर करत आहे, जिथे लढा जगाशी नसून स्वतःच्या अंतर्मनाशी आहे. बुल्ले शाह यांच्या अजरामर कवितेने प्रेरित असलेले हे गाणे दुरावा, शांतता आणि नम्रता पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग कसा सुखकर करतात, याचा शोध घेते. अशोक मस्कैन यांचा मधुरमय आवाज, मधुर शर्मा यांचा भावनिक संयम आणि स्वरित शुक्ल यांची सुटसुटीत पण मंत्रमुग्ध करणारी निर्मिती एकत्र येऊन जिव्हाळ्याचा अनुभव तयार करतात. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली कथा आता आजच्या संगीतप्रेमींसाठी नवीन स्वरात सादर होत आहे.”

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप फॉर ब्रँड्सचे भारतातील विकास व धोरणाचे प्रमुख नवनीत सोधी म्‍हणाले, “युनिव्हर्सल म्युझिक इंडियामध्ये, अस्सल आणि वैविध्यपूर्ण आवाजांना पाठबळ देणे हा आमच्या कामाचा मुख्य गाभा आहे. ‘बुल्लेया वे’ गीत उदयोन्मुख प्रतिभेला आणि अजरामर सुफी कथेला एकत्र आणते की जे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आधुनिक वाटते. आम्ही तरुण श्रोत्यांशी आमचे नाते अधिक घट्ट करत असताना या प्रवासाचा पाया रचणाऱ्यांशी कटिबद्ध आहोत आणि कोक स्टुडिओ भारतचा सांस्कृतिक वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवत आहोत. आमची ही भागीदारी भारतीय संगीत शोधण्याच्या आणि अनुभवण्याच्या पद्धतीला आज नवीन आकार देत आहे.”

मधुर शर्मा म्‍हणाले “‘बुल्लेया वे’मध्ये एक विशिष्ट प्रामाणिकपणा आहे, जो माझ्या मनाला स्पर्शून गेला. हे गाणे आरडाओरडा करणारे नाही, तर तुमच्या मनात घर करते. भावनांना फारसे न नटवता सहजपणे व्यक्त व्हाव्यात, यासाठी आम्ही हे गाणे साधे ठेवण्याचा प्रयत्‍न केला. कोक स्टुडिओ भारतने आम्हाला तो साधेपणा जपण्याचे आणि गाण्याच्या मूळ भावनेशी प्रामाणिक राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.”

अशोक मस्कैन म्हणाले, “या गाण्यामध्‍ये विशिष्ट भावनिकता आहे आणि माझ्या आवाजातून ती कशी व्यक्त करता येईल, हे समजून घेण्यासाठी मी बराच वेळ दिला. यातील भावना वास्तववादी ठेवणे आणि गाण्याच्या मूळ आशयाला न्याय देणे, हाच माझा उद्देश होता. कोक स्टुडिओ भारतचा भाग असणे आणि अशा कलाकृतीसाठी माझा आवाज देणे, हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे.”

स्वरित शुक्ल म्हणाले, “या गाण्याची निर्मिती साधी ठेवून त्यातील भावना स्पष्टपणे श्रोत्‍यांपर्यंत पोहोचवणे, हाच विचार होता. गाण्याची कथा इतकी प्रबळ असते, तेव्हा तुम्हाला काहीही जास्त करण्याची गरज नसते. कोक स्टुडिओ भारतने या विचारावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच हा फरक दिसून येत आहे.”

‘बुल्लेया वे’च्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारतचा चौथा सीझन दाखवून देत आहे की, भारताचा संगीत दर्जा एका विशिष्ट आवाजात किंवा कथेत मर्यादित राहू शकत नाही. हे गाणे जालंधरच्या गल्लीबोळांपासून कसूरच्या कवितेपर्यंतचे विविध प्रभाव एकत्र आणते. आदित्य रिखारी, कुतले खान आणि रॅव्‍हेटर यांच्या ‘ऐ अजनबी’ या गाण्याने रचलेल्या मजबूत पायावर हा सीझन पुढे जात आहे. ‘ऐ अजनबी’ सध्या स्पॉटिफाय चार्ट्सवर यशस्वी घोडदौड करत आहे आणि या गाण्‍याला श्रोत्यांची मोठी पसंती मिळत आहे. हा सीझन आपल्या संगीतातून आणि कथेतून तितकाच खोलवर प्रवास करत आहे, जिथे मुळांशी जोडलेले आणि तितकेच मधुरमय नवीन आवाज जगासमोर येत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now