इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च,पुणे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मॅनेजमेंट तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांचे यशस्वी योगदान आणि त्यांची प्रगती’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात ग्लोबल पीपल स्ट्रॅटेजी इनटंगल्स पुणेच्या एचआर विभाग प्रमुख एचआर अरु उप्पल, बिटवाईज कंपनीच्या एचआर विभाग प्रमुख (एव्हीपी) शिल्पा निंबाळकर तसेच पीएसबीयू इंजिनियरिंग कमिन्स इंडिया, पुणेच्या एचआर नेतृत्व नेहा कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. इंडसर्च संस्थेच्या संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर यावेळी उपस्थित होत्या.
अरु उप्पल म्हणाल्या की, कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांना आता मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी महिलांनी विविध क्षेत्रांतील ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांनी स्वतःला एका ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित ठेवू नये. उत्पादन, मार्केटिंग आदी विविध क्षेत्रांची माहिती असल्यास त्यांना आपल्या करिअरमध्ये अधिक प्रगती साधता येऊ शकते.
शिल्पा निंबाळकर यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणे आणि ती भूमिका सकारात्मक पद्धतीने इतरांना पटवून देणे आवश्यक असते. ही क्षमता असल्यास व्यक्ती कॉर्पोरेट क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकते. केवळ महिला म्हणून पुरुषांपेक्षा वेगळ्या सुविधा घेण्यापेक्षा पुरुषांच्या बरोबरीने ज्ञान व संधी आत्मसात केल्यास महिलांना अधिक वेगाने यश मिळू शकते.
नेहा कुलकर्णी म्हणाल्या की, कॉर्पोरेट क्षेत्रात व्यवस्थापन स्तरापर्यंत महिलांची संख्या वाढलेली दिसते; मात्र त्यापुढील उच्च पदांवर महिलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा कॉर्पोरेट क्षेत्रावरही मोठा परिणाम होत असून एआयसह इतर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठा फायदा होऊ शकतो.
जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी, संस्थेतर्फे पाहुण्यांना ‘सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला इंडसर्च संस्थेच्या संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर,डॉ. सुवर्णा शिदोरे, डॉ. अविनाश जोशी, डॉ. मेघा बागडे, प्रा. वर्षा केदार, डॉ. बिदिशा सरखेल आणि प्रा. रितेश गिरी उपस्थित होते. या कार्यक्रमातील परिसंवादाचे सूत्रसंचालन विदुला कुलकर्णी आणि तेज शर्मा यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध वाघमारे आणि श्रावणी कुलकर्णी यांनी केले.





