देशाच्या पायाभूत विकासामध्ये स्थापत्य अभियंत्यांचे मोलाचे योगदान

पुणे: “देशाच्या पायाभूत विकासामध्ये स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून बांधकाम क्षेत्राची गुणवत्ता व सुरक्षितता वाढविण्याला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित २९ व्या ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. राजेंद्र डहाळे बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ऑल इंडिया ‘बीएआय’चे माजी अध्यक्ष आर. राधाकृष्णन, बी. जी. शिर्के कंपनीचे आर. बी. सूर्यवंशी, ‘बीएआय’ महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, ‘डब्ल्यूबीएससी’चे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष महेश मायदेव व सचिव राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, खजिनदार महेश राठी आदी उपस्थित होते. 

यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ (निर्माणरत्न २०२५) युनिव्हर्सल ग्रुपचे संस्थापक रोहिदास उर्फ दादासाहेब मोरे यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. मोरे यांनी पुरस्काराची रक्कम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘बीएआय’कडे सुपूर्द केली. यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. 

राजेंद्र डहाळे म्हणाले, “स्पर्धेतील विजेत्यांनी बांधलेले फ्लॅट, पूल आणि औद्योगिक इमारतींचे बांधकाम अतिशय दर्जेदार आहे. हे पाहून माझ्या १९८९-९२ च्या सिडकोतील सेवाकाळातील आठवणींना उजाळा मिळाला. सध्या देशात महामार्ग, विमानतळ आणि मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचे जाळे विणले जात आहे, जिथे तरुण अभियंत्यांना आपली कौशल्ये दाखवण्याची मोठी संधी आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून बांधकाम क्षेत्रातील नावीन्यता, वैविध्यपूर्ण अविष्कार सर्वांसमोर येत आहेत.”

सत्काराला उत्तर देताना रोहिदास मोरे म्हणाले, “देशातील मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळत आहे. अशावेळी दर्जेदार, स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘इम्पोर्ट सबस्टिट्यूशन’वर भर देणे आवश्यक आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता वेळेत काम पूर्ण करण्यातच खरा आनंद असतो. हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना व कुटुंबाला समर्पित करत असून, सामाजिक बांधिलकीतून पुरस्काराची रक्कम संस्थेला दान करत आहे. योग्य नियोजनाद्वारेच आपण राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देऊ शकतो.”

अजय गुजर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका सांगतानाच ‘बीएआय’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बांधकाम क्षेत्रात गुणवत्तेचे नवनवीन मापदंड प्रस्थापित करत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्याचे गुजर म्हणाले. ही स्पर्धा गेल्या २९ वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात असून, निवासी संकुल, व्यावसायिक इमारती, पूल, फ्लायओव्हर आणि औद्योगिक प्रकल्प अशा एकूण १६ विविध श्रेणींमध्ये होते, असे सुनील मते यांनी सांगितले.

आर. राधाकृष्णन यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना बीएआय पुणे सेंटरचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अशा स्वरूपाची उच्च दर्जाची स्पर्धा घेऊन बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांना सन्मानित करण्याचे काम प्रेरक आहे, असे ते म्हणालो. एकता कपूर व संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले.