मोगल १७ पानी, छत्रपती १ परिच्छेद?; तेव्हा गप्प का — काँग्रेसवर टीका

मुंबई – फेब्रू २०२६: पुर्वकालीन अखंड भारताच्या भूमीत, हजारो वर्षांपासून राजेशाही आणि मध्ययुगीन इतिहासात निज़ामशाही, मोगल साम्राज्याचा इतिहास आणि समांतर शिवशाहीचाही इतिहास चालत आलेला असतांना, ‘दीर्घ काळ टिकलेले मोगल साम्राज्य’ तेवढे इतिहासातून नष्ट केले पाहीजे होते..असे फडणवीसांना सांगायचे आहे काय..?

मुघलांचा काळ मोठा असल्याने तो ‘कालखंड’ म्हणून शिकवला गेला, व्यक्ती म्हणून नाही.. हे जबाबदार मुख्यमंत्री फडणवीसांना माहीत नाही काय..?

काँग्रेस काळात शिवाजी महाराजांना केवळ १ परिच्छेद दिल्याचा तथ्यहीन आरोप करतांना, चौथीचे संपूर्ण पुस्तक ‘शिवछत्रपती’ आहे, हे फडणवीस सोयीस्करपणे विसरतात काय..?

आपले राजकीय अपयश लपवण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न निषेधार्ह असुन विरोधक नव्हेत तर फडणवीस स्वतः भ्रमित झाल्याने ‘तथ्यहीन व कथित ईतिहासांच्या स्वप्नांची ऊधळण’ करत असल्याची टिका प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील भाषणावर केली.

राज्याचे मुख्यमंत्री बेमालूमपणे व बेजबाबदारपणे खोटे बोलत असून, मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याचा आरोप ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला.

ते म्हणाले की टिपू सुलतान’ने ७५,००० हिंदूच्या हत्त्या कोणत्या साली केल्या (?) आणि त्याबद्दल कोणी आणि कोठे लिहीले याची माहितीसुद्धा फडणवीसांनी देशातील जनतेस द्यायला हवी होती.

हिंदू – मुस्लिम भेदाभेदाची राजकीय गरज लक्षात घेऊन टिपू सुलतान बद्दल आकस व द्वेष निर्माण झाल्यानेच फडणवीस राज्यातील जनतेस संभ्रमित करत असल्याची टिका काँग्रेस ने केली.

भाजपच्या वरीष्ठ संविधानिक पदांवरील नेत्यांनी आजतागायत, टिपू सुलतानच्या नावे रस्ते, योजना का केल्या..? टिपू सुलतानच्या नावे कार्यक्रम का राबवले? त्यांनाही आता फडणवीस दोष देणार की त्यावर काही प्रायश्चित्त घेणार…?

संविधानाच्या प्रतीवर राष्ट्रपुरुषांच्या मालीकेत टिपू सुलतानचे चित्र छापले गेले.. तेंव्हा जनसंघाचे नेते व फडणवीसांचे पुर्वज गप्प का होते..?

हे प्रश्न विचारत ते पुढे म्हणाले की, याचाच अर्थ टिपू सुलतानाची इंग्रज विरोधी भुमिका व त्याने केलेला इंग्रजांशी संघर्ष त्यांना आधी मान्यच होता.

इंग्रज ‘टिपू सुलताना’चे शत्रूच् होते, त्यामुळे त्यांनी टिपूबाबत लिहिलेले सारेच खरे आहे असे फडणवीस का मानतात..? ब्रिटिश वसाहतवाद्यांनी ‘टिपू सुलतान’ बाबतच्या सांगीतलेल्या ईतिहासात एकतर्फीपणा असून त्याचे पुरावे अनेकदा मिळत नाहीत म्हणून तो विश्वसनीय नसल्याचे ‘मराठी विश्वकोषात’ लिहीले असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात, मात्र त्याकडे फडणवीस सोईने दुर्लक्ष करतात काय..?

भाजप नेते, ब्रिटीश ‘वसाहतवादी स्मृतींचे, लेखना’चे नामोनिशान मिटवण्याच्या गप्पा करतात तर मग टिपू सुलतान बाबत वसाहतवाद्यांचे संदर्भ हीन लेखनास दिपस्तंभ मानतात काय..(?) असा उपहासात्मक सवाल ही गोपाळदादा तिवारी यांनी केला.

महाराष्ट्रातील आजच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी सत्ताधारी नेते कथित व निरर्थक इतिहासात जातात आणि समाजात तेढ माजवत, सामाजिक सलोख्यास बाधा निर्माण करण्याचे बेजबाबदार कृत्य करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

टिपू सुलतान, मोगल, निजाम आणि छ शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आज प्रश्न उपस्थित करणारे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस खरे तर पुर्वीच्या “तत्कालीन जनसंधी नेत्यांच्याच आकलन व निर्णय क्षमतेवर” (?) प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोपही वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केला