नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता भारताच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. IBM Institute for Business Value आणि IndiaAI यांनी संयुक्तपणे केलेल्या नव्या अभ्यासानुसार, २०३० पर्यंत एआयमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत ५०० अब्ज डॉलर्सहून अधिक भर पडू शकते. त्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एआय-आधारित अर्थव्यवस्थांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीआहे.
‘फ्रॉम प्रॉमिस टू पॉवर : हाउ एआय इज रिडिफायनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर’ या अहवालात भारताच्या एआय क्षेत्रातील वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उद्योग क्षेत्रातील पाचपैकी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एआयमधील गुंतवणूक थेट जीडीपी वाढीस चालना देईल, असे मत व्यक्त केले. तर ७३ टक्के उद्योगपतींनी २०३० पर्यंत भारत जागतिक स्तरावरील आघाडीचे एआय राष्ट्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मात्र, या प्रगतीच्या वाटचालीत मोठी ‘इन्फ्लेक्शन गॅप’ असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक कंपन्यांच्या तुलनेत एआयचा स्वीकार करण्यात आपण मागे असल्याची कबुली ७२ टक्के भारतीय कंपन्यांनी दिली आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांतील दरी भरून काढणे भारतासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव S. Krishnan म्हणाले, “भारत आता एआयविषयीच्या जागतिक चर्चेत केवळ सहभागी होत नाही, तर त्या चर्चेला दिशा देत आहे. एआय हे देशातील नागरिकांच्या आकांक्षांचे विस्तार रूप असावे आणि त्याद्वारे समावेशक विकास व राष्ट्रीय प्रगती साध्य व्हावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘विकसित भारत’च्या ध्येयाशी सुसंगत राहून आम्ही विश्वास, नैतिकता आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यांवर आधारित मानवकेंद्री एआय दृष्टिकोन स्वीकारत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “IndiaAI आणि IBM यांचा हा संयुक्त अभ्यास योग्य वेळी समोर आला आहे. यामुळे धोरण, उद्योग आणि नवोन्मेष यांच्यात समन्वय साधला जाईल आणि भारताच्या आर्थिक भवितव्यासाठी एआयची संपूर्ण क्षमता वापरणे शक्य होईल.”
Sandeep Patel यांनी सांगितले की, “भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एआय हे सर्वात प्रभावी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकते. मजबूत डेटा फाउंडेशन, हायब्रिड आर्किटेक्चर आणि एआयसोबत काम करण्यास सक्षम मनुष्यबळ यांच्या मदतीने भारतीय कंपन्या विश्वासार्ह एआय प्रणाली विकसित करू शकतात. केवळ एआयचा मोठ्या प्रमाणात स्वीकार पुरेसा नाही, तर कौशल्य, प्रशासन आणि पायाभूत सुविधांमध्ये योग्य गुंतवणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
अहवालानुसार, भारतात ‘सॉव्हरिन एआय’ आणि ‘हायब्रिड-बाय-डिझाइन’ मॉडेलकडे कल वाढत आहे. विशेषतः नियमनबद्ध क्षेत्रे आणि सार्वजनिक प्रणालींसाठी डेटा नियंत्रण व स्थानिक पातळीवरील डेटा सुरक्षा महत्त्वाची ठरत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७४ टक्के वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेटा लोकेशनवर नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले.
या मॉडेलमुळे जागतिक नवोन्मेषाचा लाभ घेत असतानाच संवेदनशील माहितीवर नियंत्रण राखणे शक्य होणार आहे. त्यामुळे भारताला स्वतःच्या अटींवर आणि आत्मविश्वासाने एआयचा विस्तार करण्यासाठी मजबूत पाया मिळणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.





