व्यावसायिक विश्वात लिंगभेदातीत विचार व कृती सक्षम बनवते; डाॅ. माधुरी कानिटकर

By: Editor_Manas

On: Tuesday, May 12, 2026 5:20 PM

Google News
Follow Us
पुणे : “डाॅक्टर, लष्करी अधिकारी आणि शिक्षक, अशा तीन भूमिका निभावताना वैद्यकीय शिक्षणामुळे मला सेवाभाव, जबाबदारीचे भान मिळाले. लष्करी सेवेने शिस्त, वेळेचे महत्त्व, नेमकेपणा दिला आणि या सकारात्मक गोष्टींचा मला शिक्षकी पेशात उपयोग झाला. व्यावसायिक कारकीर्द घडवताना, लिंगभेदातीत विचार आणि कृती करणे, तुम्हाला अधिक सक्षम करते,” असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डाॅ. माधुरी कानिटकर यांनी केले.

सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवांसाठी झटणाऱ्या समवेदना संस्थेच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात कानिटकर बोलत होत्या. ‘जिद्द, शिस्त आणि आरोग्य – एका महिला जनरलचा यशस्वी मंत्र’, असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. एरंडवणे येथील आदर्श अभिनव सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र कानिटकर, समवेदना संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य राजीव साबडे, संस्थेचे व्यवस्थापक अमर पवार, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डाॅ. राजा व रेणु दांडेकर उपस्थित होते. संस्थेचे हितचिंतक चंद्रकांत आरोळे आणि माधवी राऊत यांचा डाॅ. कानिटकर यांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अहवालाचे प्रकाशनही डाॅ. कानिटकर यांनी केले.

डाॅ. कानिटकर यांनी स्वतःच्या वैद्यकीय शिक्षणापासूनचा काळ, कौटुंबिक पार्श्वभूमी, लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश, प्रत्यक्ष लष्करी वैद्यकीय सेवेचा स्वीकार, एकाच क्षेत्रातील सहचराची निवड, प्रदीर्घ काळातील लष्करी सेवेचा अनुभव आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी असे विविध टप्पे उलगडले. समवेदना संस्थेतर्फे वंचित आणि गरजू विद्यार्थी, महिला, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी केले जाणारे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
समाजघटकांविषयीची आत्मीयता आपल्या कृतीतून स्वात्मीयतेकडे (ओनरशिप) जाण्याचा प्रवास व्यक्ती म्हणून आपली संवेदनशीलता दर्शवतो. सुरवातीला माझे ध्येय वैद्यकीय शिक्षण घेणे, असे होते. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात मला शिस्त आणि नेमकेपणा भावला. त्यामुळे वेगळी वाट मिळाली आणि मी लष्करी सेवेचा भाग झाले. मी जाणीवपूर्वक उत्तर विभागाची वैद्यकीय जबाबदारी स्वीकारली. त्यापूर्वी कुणीही महिला लष्करी वैद्यकीय अधिकारी म्हणून तिथे पोचली नव्हती. तिथे महिलांचे स्वच्छतागृहदेखिल नव्हते. माझी सुरवात इथपासून झाली. मी निवृत्त होईपर्यंत फोनवरचे निरोप, ‘सर’, अशा नावाने येत असत. अशा वास्तवातून लिंगभेदातीत विचारांची प्रेरणा मला मिळाली, असे डाॅ. कानिटकर म्हणाल्या.

क्षेत्र कुठलेही असो, इच्छाशक्ती, त्यानुसार प्रयत्न, ध्येयाची नेमकी माहिती, बदलांचा स्वीकार, नवे शिकण्याची मानसिकता, कुटुंबियांचा पाठिंबा, शिस्तपालन, कामातली अचूकता, नेमकेपणा, नेतृत्वगुण, बुद्धी आणि भावनांचे संतुलन, विचार आणि कृती यातील समतोल, टीमवर्क करण्यावर भर असे गुणविशेष व्यक्ती म्हणून व्यावसायिक आणि वैयक्तिक जगातही आत्मसात करणे आवश्यक असते आणि हे साध्य करण्यासाठी तुमचे शारीरिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.

राजीव साबडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अमर पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून होणार्या सेवाकार्याचे क्षेत्र व्यापक करण्याची योजना असल्याचे सांगितले. संस्थेची स्वतःची वास्तू, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, महिलांमधील आरोग्यविषयक जागरुकता यांबाबत गरजू रुग्ण आणि आरोग्यसेवा, यांच्यातील सेतू होण्याचे कार्य विस्तारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष नितीनभाई देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर कलुंजे यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026