पुणे, प्रतिनिधी : गर्भावस्थेशी संबंधित उच्च रक्तदाब आणि जेस्टोसिससारख्या गंभीर आजारांवर केंद्रित ५३ व्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर जेस्टोसिस (WOG) आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. गेस्टोसिस इंडिया असोसिएशन (GIA) यांच्या वतीने आयोजित या परिषदेला पुणे प्रसूती व स्त्रीरोग संघटना (POGS), ISOPARB पुणे चॅप्टर तसेच भारती विद्यापीठाच्या IRSHA संस्थेचे सहकार्य लाभले आहे. मातृ आरोग्य, सुरक्षित प्रसूती आणि उच्च जोखीम गर्भावस्थेशी संबंधित जागतिक संशोधन, अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धतींची देवाणघेवाण या परिषदेत होणार आहे.
परिषदेची सुरुवात गर्भावस्थेतील वाढत्या स्थूलतेवर आधारित विशेष कार्यशाळेने होणार असून, स्थूलता ही जेस्टोसिससह अनेक गुंतागुंतींचे प्रमुख कारण ठरत असल्याने या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत आई व गर्भातील गुंतागुंत, प्रसूतीदरम्यान उद्भवणारे धोके, अतिरक्तस्राव, क्रिटिकल केअर व्यवस्थापन तसेच प्रसूतीनंतर आई आणि बाळांच्या दीर्घकालीन आरोग्य परिणामांवर विशेष चर्चा होणार आहे. सुरक्षित मातृत्वासाठी वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभात वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर जेस्टोसिसच्या अध्यक्षपदाचे जागतिक नेतृत्व हस्तांतरण होणार असून, प्रा. हेमा दिवाकर यांची २०२६ साठी WOG च्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे. या निवडीमुळे मातृ आरोग्य क्षेत्रातील भारताची जागतिक भूमिका अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. तसेच गेस्टोसिस इंडिया असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. गिरीजा वाघ स्वीकारणार आहेत.
परिषदेत तरुण डॉक्टर, पदव्युत्तर विद्यार्थी आणि नवोदित संशोधकांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जेस्टोसिस, स्थूलता आणि मातृ आरोग्याशी संबंधित भारतीय संशोधन सादर करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पॅनेल चर्चा, प्रत्यक्ष केस-आधारित सत्रे तसेच उच्च जोखीम गर्भावस्था आणि स्थूलता विषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग ही परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत. महिलांचे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यासाठी आणि सुरक्षित मातृत्वाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जागतिक स्तरावर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता या परिषदेत अधोरेखित करण्यात येणार आहे.





