राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला वेग! दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By: Editor_Manas

On: Friday, November 13, 2026 5:25 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी मानस : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग मिळत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेच्या परिसरात झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून तर्कवितर्क सुरू आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या हयातीतही दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे काही नेत्यांच्या वक्तव्यांमधून समोर आले आहे. सुरुवातीला या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली जात होती. मात्र, आता दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींमुळे विलीनीकरणाच्या चर्चेला नव्याने बळ मिळाले आहे.

संसदेच्या परिसरात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रित भोजनही केल्याची माहिती आहे. सुमारे ३५ मिनिटांच्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की विलीनीकरणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिन्ही नेते दिल्लीत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचीही दिल्लीत बैठक सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या घडामोडींकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भुजबळांचा मोठा खुलासा; अजित पवार-जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याचा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. दिवंगत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात आपल्या उपस्थितीतच विलीनीकरणाच्या विषयावर सुमारे ४० ते ४५ मिनिटे चर्चा झाल्याचा दावा भुजबळ यांनी केला.

भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आजारी असताना अजित पवार आणि जयंत पाटील त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटायला आले होते. त्यावेळी भुजबळ यांनी स्वतःहून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती. अजित पवार सक्षम नेतृत्व करत असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

या चर्चेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय अजित पवार यांच्या हयातीतच विचाराधीन होता, असा दावा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

विलीनीकरणाबाबत नेमका निर्णय काय?

दिल्लीत सुरू असलेल्या भेटीगाठी, वरिष्ठ नेत्यांमधील चर्चा आणि भुजबळ यांच्या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या राजकीय हालचालींचे पुढील स्वरूप काय असेल आणि दोन्ही गट एकत्र येण्याबाबत अंतिम निर्णय कधी घेतला जाणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026