प्रतिनिधी – मानस : भारतातील लोकप्रिय खाद्य ब्रँड ‘मदर्स रेसिपी’ आपल्या आयकॉनिक लोणच्यांच्या श्रेणीची दृश्य ओळख नव्याने सादर करण्याच्या तयारीत आहे. ब्रँड सुरू झाल्यानंतर प्रथमच लोणच्यांच्या पॅकेजिंग आणि डिझाइनमध्ये मोठा बदल करण्यात येत असून, पारंपरिक चव आणि आधुनिक ग्राहकांची आवड यांचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘आईच्या हातची चव’ आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या लोणच्यांची ओळख जपणाऱ्या मदर्स रेसिपीने या नव्या डिझाइनमध्ये भारतीय संस्कृती आणि भावनिक नातेसंबंधांना विशेष स्थान दिले आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या काचेच्या बाटल्यांमधील लोणच्यांना आता अधिक आकर्षक आणि आधुनिक रूप देण्यात येणार आहे.
ब्रँडकडे ६४ हून अधिक प्रकारची लोणची उपलब्ध असून, प्रत्येक डिझाइनमध्ये विविध प्रादेशिक परंपरा आणि संस्कृतीचा प्रभाव दिसून येईल. पारंपरिक साड्यांचे रंग, जुनी भांडी, रंगीत कापडी रुमाल, तसेच विविध भागांतील मसाले आणि फळांचा वापर यांचे प्रतिबिंब नव्या पॅकेजिंगमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक लोणच्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तपशीलवार फोटोग्राफी आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला आहे.
या नव्या डिझाइनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणचे बनवताना दिसणारे आईचे हात. विविध भागांतील पारंपरिक बांगड्यांसह दाखवलेले हे हात ग्राहकांना घरगुती लोणच्यांच्या आठवणींशी जोडण्याचा प्रयत्न करतात. तसेच उत्पादनात कोणतेही कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
डेसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालक संजना देसाई यांनी सांगितले की, “मदर्स रेसिपीची लोणची ग्राहकांसाठी विश्वास, परंपरा आणि आईच्या प्रेमाची चव घेऊन येतात. त्यामुळे हा बदल केवळ पॅकेजिंगपुरता मर्यादित नसून, आजच्या ग्राहकांपर्यंत ही परंपरा नव्या स्वरूपात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
तर ‘देअरफोर डिझाइन’चे सीईओ धुन पटेल म्हणाले की, “नवीन डिझाइन तयार करताना ब्रँडची जुनी ओळख कायम ठेवत त्याला आधुनिक बाजारपेठेसाठी अधिक सुसंगत बनवण्यावर भर देण्यात आला.”
मदर्स रेसिपीच्या नव्या लोणच्यांच्या पॅकेजिंगची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने विविध बाजारपेठांमध्ये करण्यात येणार आहे. ब्रँडचे उत्पादन भारतासह ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाते. पुणे, कोलकाता आणि गुजरातमधील आधुनिक उत्पादन केंद्रांमधून हे पदार्थ तयार केले जातात.




