इंधन जपून वापरा, वर्षभर सोनं खरेदी टाळा; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन

By: Editor_Manas

On: Sunday, May 10, 2026 4:41 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होत असून, अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचे आणि वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.

हैदराबाद येथे भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर गरजेनुसार करणे आवश्यक आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत आणि भारतालाही त्याचा फटका बसत आहे. “आपल्या देशात मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन होत नाही. त्यामुळे इंधन बचत ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाचे सल्लेही दिले. शक्य असल्यास परदेश प्रवास टाळावा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा आणि ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तेथे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यालयीन बैठकींसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा अधिक वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.

सोन्याच्या खरेदीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, परकीय चलनाची बचत करण्यासाठी काही काळ सोन्याची खरेदी कमी करणे आवश्यक आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते आणि त्यासाठी डॉलरमध्ये व्यवहार होतो. सध्याच्या परिस्थितीत डॉलरची बचत करणे देशासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अर्थतज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, भारत हा आशियातील सर्वाधिक सोन्याची आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. तसेच कच्च्या तेलाच्या आयातीसाठीही मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च होतो. त्यामुळे परकीय चलन साठा टिकवण्यासाठी इंधन बचत आणि सोन्याची खरेदी कमी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now