पुणे : लक्झरी ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित लेक्सस इंडियाने पुण्यात नव्या गेस्ट एक्सपीरियन्स सेंटरचे (GEC) उद्घाटन केले आहे. भारतातील ग्राहकांना लेक्ससचा वैशिष्ट्यपूर्ण लक्झरी अनुभव अधिक जवळून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईनंतर महाराष्ट्रातील हे दुसरे, तर मुंबईबाहेरील राज्यातील पहिले गेस्ट एक्सपीरियन्स सेंटर ठरले आहे.
भारतातील लक्झरी ऑटोमोबाईल बाजारपेठेचा विस्तार होत असताना ग्राहकांना दर्जेदार वाहने, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्यावर लेक्सस इंडियाचा भर आहे. पुण्यातील या नव्या केंद्राची स्थापना भारत टोयोटा त्सुशो किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड (लेक्सस भारत) या संयुक्त उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे. या उपक्रमात किर्लोस्कर सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, टोयोटा त्सुशो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जपानमधील टोयोटा त्सुशो कॉर्पोरेशन यांचा सहभाग आहे.
या केंद्राचे उद्घाटन केएसपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक गीतांजली विक्रम किर्लोस्कर, टीटीआयपीएलचे संचालक व मुख्य वित्तीय अधिकारी जुन शिराटोरी, लेक्सस भारतचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास चिविकुला आणि लेक्सस इंडियाचे अध्यक्ष हिकारू इकेउची यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीलर भागीदारांचे वरिष्ठ नेतृत्व, लेक्सस भारत, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे प्रतिनिधी तसेच मान्यवर उपस्थित होते.
अहमदाबाद आणि सुरत येथील केंद्रांच्या उद्घाटनानंतर पुण्यातील हे नवीन केंद्र लेक्सस इंडियाच्या देशव्यापी विस्तारातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात लक्झरी वाहनांच्या बाजारपेठेला अधिक चालना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
लेक्ससच्या ‘सिंपल येट एलिगंट’ आणि ‘मिनिमल येट रिच’ या तत्त्वज्ञानावर आधारित या केंद्राची रचना करण्यात आली आहे. आधुनिक डिझाइन, आत्मीय आदरातिथ्य आणि ग्राहकांच्या गरजांनुसार आखलेले अनुभव ही या केंद्राची वैशिष्ट्ये आहेत. जपानमधील ‘ओमोटेनाशी’ या मनापासून सेवा करण्याच्या परंपरेचा आणि भारतातील ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीचा सुंदर मिलाफ येथे अनुभवायला मिळणार आहे.
लेक्सस इंडियाचे अध्यक्ष हिकारू इकेउची म्हणाले, भारतातील लक्झरी ऑटोमोबाईल बाजारपेठ वेगाने विकसित होत असून ग्राहक आता वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आणि अर्थपूर्ण अनुभवांना प्राधान्य देत आहेत. पुणे गेस्ट एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन हा लेक्सस इंडियासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याच्या मजबूत ऑटोमोबाईल वारशामुळे आणि शैक्षणिक प्रगतीमुळे हे शहर आमच्या मूल्यांशी सुसंगत आहे. या नव्या केंद्रातून कारागिरी, नवोपक्रम आणि ओमोटेनाशी या मूल्यांवर आधारित विशेष लक्झरी अनुभव ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लेक्सस भारतचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास चिविकुला यांनी सांगितले, पुण्यातील केंद्राचे उद्घाटन भारतातील लेक्सससाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे. सध्या लेक्सस भारतकडे तीन गेस्ट एक्सपीरियन्स सेंटर्स आहेत. नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करताना जागतिक दर्जाचे लक्झरी रिटेल मानदंड आणि ग्राहकांना वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव देण्यावर कंपनीचा भर राहणार आहे.
या केंद्राला भेट देणाऱ्या ग्राहकांना लेक्ससची विविध लक्झरी वाहने जवळून पाहता येणार असून, कंपनीची प्रगत तंत्रज्ञान प्रणाली, उत्कृष्ट कारागिरी आणि इलेक्ट्रिफाइड मोबिलिटी सोल्यूशन्सचा अनुभव घेता येईल. तसेच पुण्यातील लेक्सस सर्व्हिस पॉईंटवर वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सुविधाही उपलब्ध असतील.
सध्या लेक्सस इंडिया मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, चंदीगड, कोची, अहमदाबाद, सुरत आणि पुणे या शहरांमध्ये गेस्ट एक्सपीरियन्स सेंटर्स चालवत आहे. ग्राहकांना वाहन खरेदीपासून ते संपूर्ण मालकीच्या प्रवासापर्यंत उत्तम सेवा मिळावी, यासाठी कंपनी आपल्या आफ्टरसेल्स नेटवर्कचाही विस्तार करत आहे. देशभरात कंपनीचे १९ लेक्सस सर्व्हिस पॉईंट (LSP) टचपॉइंट्स कार्यरत आहेत.
ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीकडून पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स पॅकेज दिले जाते. यामध्ये टोइंग, टॅक्सी सेवा आणि वाहन दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासारख्या सुविधांचा समावेश आहे. सर्व मॉडेल्ससाठी आठ वर्षे किंवा दोन लाख किलोमीटरपर्यंत वाहन आणि हायब्रिड बॅटरी वॉरंटी देण्यात येते.
याशिवाय आरएक्स, एनएक्स आणि ईएस या मॉडेल्ससाठी कमी ईएमआय आणि गॅरंटीड फ्युचर रेसिड्युअल व्हॅल्यूसह ‘अश्युअर्ड बाय बॅक’ कार्यक्रम उपलब्ध आहे. तसेच ‘लेक्सस लक्झरीकेअर’ अंतर्गत कम्फर्ट, रिलॅक्स आणि प्रीमियर असे विविध सेवा पॅकेजेसही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुण्यातील नव्या केंद्रामुळे महाराष्ट्रातील लक्झरी वाहन ग्राहकांना लेक्ससच्या जागतिक दर्जाच्या वाहनांसोबतच प्रीमियम सेवा आणि विशेष आदरातिथ्याचा अनुभव स्थानिक पातळीवर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.





