क्रॅश टेस्टमध्ये फेल! ‘या’ लोकप्रिय कार फॅमिलीसाठी असुरक्षित

By: Editor_Manas

On: Sunday, May 10, 2026 4:17 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : आजच्या काळात चारचाकी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. भारतीय ग्राहक आता केवळ स्वस्त नव्हे तर सुरक्षित कारलाही प्राधान्य देताना दिसत आहेत. वाहनांच्या सुरक्षेची तपासणी करणारी संस्था Global NCAP (GNCAP) विविध कारची क्रॅश टेस्ट घेते आणि त्यानुसार ० ते ५ स्टारपर्यंत रेटिंग देते. कमी रेटिंग मिळालेल्या कार अपघाताच्या वेळी प्रवाशांना पुरेशी सुरक्षा देण्यात अपयशी ठरू शकतात. अशाच काही लोकप्रिय कारबाबत जाणून घेऊया.

Citroen e-C3

Citroen e-C3 ही इलेक्ट्रिक हॅचबॅक कार असली तरी सुरक्षेच्या बाबतीत तिची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. Global NCAP च्या चाचणीत या कारला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ० स्टार, तर मुलांच्या सुरक्षेसाठी फक्त १ स्टार मिळाला. कारचे बॉडी स्ट्रक्चर कमकुवत असल्याचे टेस्टमध्ये समोर आले. विशेषतः साईड इम्पॅक्टमध्ये प्रवाशांना पुरेशी सुरक्षा मिळत नसल्याचे आढळले.

Maruti Suzuki Eeco

फॅमिली आणि व्यावसायिक वापरासाठी लोकप्रिय असलेली Maruti Suzuki Eeco देखील सुरक्षेच्या चाचणीत कमी पडली. या व्हॅनला Global NCAP मध्ये ० स्टार रेटिंग मिळाले आहे. एअरबॅग असूनही चालकाच्या छाती आणि गुडघ्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका असल्याचे समोर आले. याशिवाय कारचा बॉडी शेलही पुरेसा मजबूत नसल्याचे निदर्शनास आले.

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki S-Presso ला सुरुवातीला ० स्टार रेटिंग मिळाले होते. नंतर काही सुधारणा केल्यानंतर या कारला १ स्टार देण्यात आला. सध्या यात ड्युअल एअरबॅग स्टँडर्ड देण्यात आले असले तरी बॉडी स्ट्रक्चर आणि फुटवेल एरिया अजूनही पूर्णपणे सुरक्षित मानला जात नाही. वेगात अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका वाढू शकतो.

Renault Kwid

कमी किंमत आणि आकर्षक डिझाइनमुळे Renault Kwid मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत ही कार मागे पडली आहे. Global NCAP च्या चाचणीत या कारला १ स्टार रेटिंग मिळाले. चालकाच्या डोक्याला काही प्रमाणात संरक्षण मिळत असले तरी छाती आणि पायांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचे समोर आले.

Mahindra Bolero Neo

मजबूत SUV म्हणून ओळख असलेल्या Mahindra Bolero Neo ची कामगिरीही क्रॅश टेस्टमध्ये अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. या कारला फक्त १ स्टार रेटिंग मिळाले आहे. विशेषतः साईड इम्पॅक्ट आणि मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कमी गुण मिळाले. बाहेरून दमदार दिसणारी ही SUV सुरक्षा मानकांमध्ये मात्र कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now