अनियमित पाळी आणि चेहऱ्यावर अवांछित केस; आयुर्वेदातून नैसर्गिक उपायांची दिशा

By: Editor_Manas

On: Wednesday, April 1, 2026 3:06 PM

Google News
Follow Us

नवी दिल्ली, प्रतिनिधी : आधुनिक जीवनशैलीमुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी (Irregular Periods) आणि चेहऱ्यावर अवांछित केस (Hirsutism) या समस्या झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या समस्या केवळ बाह्य स्वरूपापुरत्या मर्यादित नसून शरीरातील हार्मोनल असंतुलनाचे गंभीर संकेत असल्याचे आयुर्वेद तज्ञ डॉ. रस पाल कौर यांनी सांगितले.

विशेषतः पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा या समस्यांमागील प्रमुख कारण म्हणून समोर येत असून, याचा महिलांच्या मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे. अनेक महिला संकोचामुळे या समस्यांबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे आजार अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होते.

आयुर्वेदानुसार कारणे

आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोषांचे असंतुलन, तसेच पचनशक्ती कमी होणे (अग्निमांद्य) ही या विकारांची प्रमुख कारणे आहेत. शरीरात ‘आम’ (विषारी घटक) साचल्याने हार्मोनल असंतुलन निर्माण होते. यामुळे अंडोत्सर्जनात अडथळा, अँड्रोजेन हार्मोन वाढ, अनियमित पाळी आणि चेहऱ्यावर केस वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

जीवनशैलीत बदलांची गरज

तज्ज्ञांच्या मते, जंक फूड, ताणतणाव, उशिरापर्यंत जागरण आणि व्यायामाचा अभाव या गोष्टी समस्या वाढवतात. नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि व्यायाम यांचा अवलंब केल्यास या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.

आयुर्वेदिक उपाय उपयुक्त

शतावरी, अश्वगंधा, हळद, दालचिनी आणि मेथी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती हार्मोन संतुलनासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणतीही औषधे तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, असेही स्पष्ट करण्यात आले.

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

“ही समस्या सामान्य असली तरी दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत वाढू शकते. योग्य वेळी उपचार आणि जीवनशैलीतील बदल केल्यास आरोग्य सुधारू शकते,” असे डॉ. कौर यांनी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now