महिला दिनानिमित्त ‘उजास’च्या महाराष्ट्रातील उत्पादन नेटवर्कचा विस्तार

पुणे, ४ मार्च २०२६ : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत अद्वैतेशा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘उजास’ या संस्थेने महिलांच्या नेतृत्वाखालील उत्पादन नेटवर्कचा विस्तार केला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सहकार्याने वर्धा येथे नवीन ‘उजास ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरू करून हा विस्तार करण्यात आला आहे. महिला दिन जवळ येत असल्याचे औचित्य साधणारा  हा उपक्रम स्केलेबल ग्रासरूट एंटरप्राइझ मॉडेल्सद्वारे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्याच्या ‘उजास’च्या कटिबद्धतेला बळकटी देणारा आहे.  

ही भर पडल्यामुळे ‘उजास’ आता महाराष्ट्रात दोन ‘उजास’ ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स चालवत असून ती एकत्रितपणे ४५ स्वयंसेवा गटांतील महिलांना रोजगार पुरवत आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील सुमारे १,५०० अतिरिक्त महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करत आहे. जालना येथील पूर्वीच्या युनिटने दोन वर्षांत १,११,१२५ पुनर्वापरयोग्य कापडी पॅड तयार करून उत्कृष्ट फलनिष्पत्ती दाखवली आहे. तसेच  स्थानिक आर्थिक सहभागाला शाश्वत चालना देणारा म्हणून समुदाय-चालित उत्पादनाला सुस्थापित केले आहे.

जालन्यातील युनिटने स्थानिक पातळीवर आणि संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड आणि बुलढाणा यांसारख्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कापडी पॅडचे यशस्वीरित्या वितरण केले आहे. तसेच ‘उजास’ मेन्स्ट्रुअल हेल्थ एक्सप्रेस मोहिमेद्वारे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात आपली व्याप्ती वाढविली आहे. या मोहिमेमुळे २५ राज्ये आणि १२१ शहरांमध्ये मोफत पॅडचे वितरण सुलभ झाले आहे. त्यामुळे जागरूकता, सुलभता आणि व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे.

‘उजास’च्या प्रमुख पूनम पाटकर म्हणाल्या, “’उजास’ ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिटची रचना कटिंग आणि स्टिचिंगपासून ते गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्री समन्वयापर्यंत पूर्णपणे महिलांच्या व्यवस्थापनाखाली असलेली उत्पादन परिसंस्था म्हणून करण्यात आली आहे. आमच्या जालना युनिटच्या कामगिरीकडे पाहता प्रत्येक सहभागी महिला कौशल्य आणि उत्पादनानुसार सुमारे ७५,००० रुपयांचे स्थिर वार्षिक उत्पन्न मिळवू शकते, त्यामुळे तिच्या कुटुंबासाठी अपेक्षित आर्थिक आधार मिळतो तर प्रत्येक बचत गटाला सामूहिकरीत्या शाश्वत उद्यमी उत्पन्नाचा फायदा होतो. उत्पादनाव्यतिरिक्त महिलांना आर्थिक साक्षरता, स्वच्छता मानके आणि व्यवसाय प्रक्रियांचे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्या स्वतंत्रपणे युनिटचे व्यवस्थापन आणि विस्तार करू शकतील. हा केवळ रोजगार नाही – ही उपजीविकेची सुरचित मालकी असून ती आत्मविश्वास, कौशल्ये आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करते.”

या नवीन सुविधेतून दरवर्षी ५५,००० हून अधिक पुनर्वापरयोग्य कापडी पॅडचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातून महिलांच्या नेतृत्वाखालील उत्पादन केंद्रांचे ‘उजास’च्या वाढणारे नेटवर्क आणखी मजबूत होईल. सक्रिय स्वयंसेवा गट परिसंस्था असलेले प्रदेश उद्योगनिर्मितीच्या जोडीने उत्पन्न निर्माण करणारे स्थानिक पातळीवरचे व्यवस्थापन असलेले उद्योग कसे उभारू शकतात आणि त्याच वेळेस आवश्यक आरोग्य गरजा पूर्ण करू शकतात, हे या उपक्रमातून दिसून येते.

उद्योगनिर्मितीच्या जोडीलाच सहभागी महिला त्यांच्या समुदायांमध्ये मासिक पाळीच्या माहितीपूर्ण आरोग्य पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातील प्रवाद कमी करण्यासाठी जागरूकता सत्रांचे नेतृत्व करतात.’उजास’ ग्रीन क्लॉथ पॅड पुन्हा वापरता येण्याजोगे आणि रसायनमुक्त असून ते मासिक पाळीतील कचरा कमी करून आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार वापराला आधार देऊन डिस्पोजेबल उत्पादनांना परवडणारा पर्याय देतात.

हा विस्तार म्हणजे महाराष्ट्राच्या तळागाळातील महिलांद्वारे संचालित उद्यमांना पाठबळ देण्याच्या ‘उजास’च्या मिशनचे पुढचे पाऊल आहे. उपजीविकेची निर्मिती, उद्यमशीलता आणि समुदायांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी ते नवीन वाटा तयार करत आहे.