पुणे इंटरनॅशनल सेंटर तर्फे आयोजित ‘पलाश’ हा कला सोहळा संपन्न

पुणे, 4 मार्च 2026: संगीत, संवाद आणि चिंतन यांचा संगम असलेल्या ‘पलाश’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच पुणे इंटरनॅशनल सेंटर (पी.आया.सी.) तर्फे पंचवटी येथे करण्यात आले होते. पलाशच्या प्रथम आवृत्तीमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमात, सुप्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायक आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी रसिकांना आपल्या विचारांनी आणि संगीताने समृद्ध केले.

पी.आया.सी.च्या कला आणि संस्कृती विभागाच्या संयोजिका आरती किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘पलाश’ हा एक अभिनव सांस्कृतिक उपक्रम आहे. केवळ धोरणात्मक चर्चांपुरते मर्यादित न राहता, कलेच्या माध्यमातून विचारांना गती देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक जाणीवपूर्वक पाऊल आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी टी. एम. कृष्णा यांच्या ‘वी द पीपल ऑफ इंडिया – डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्या अनुषंगाने प्रख्यात राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी कृष्णा यांच्या बरोबर विश्लेषणात्मक संवाद साधला. संगीत, प्रतिकात्मता, कला, त्याचे शास्त्र, त्यातली बहुरंगी आविष्कार, कलाकारांनी ज्वलंत सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिका घेण्याची गरज आदि विषयांवर मार्मिक भाष्य करत कृष्णा यांनी श्रोत्यांना विचारची एक नवी दिशा दाखवून दिली. ‘कला आणि प्रतीक आपल्या ओळखीवर व आकलनावर कशाप्रकारे प्रभाव टाकतात?’ याबद्दल श्रोत्यांच्या मनातील खोल उत्सुकता यामधून दिसून आली.

दुसऱ्या सत्रात टी. एम. कृष्णा यांनी ‘जोगप्पा’ या पारंपरिक तृतीयपंथीय संगीत परंपरेसोबत विशेष गायन सादर केले. या प्रसंगी पुण्यातील आणि आसपासच्या भागांतील तृतीय पंथीयांची उपस्थिती उल्लेखनीय  होती. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरला. कार्यक्रमात त्यांनी मराठी आणि कन्नड भाषेतील विविध संगीत रचना पेश केल्या. प्रेक्षकांच्या खुल्या आणि उदार प्रतिसादामुळे हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण न राहता एक अर्थपूर्ण सामूहिक अनुभव बनला. ज्यातून पुण्यातील जाणकार आणि सजग श्रोत्यांनी या नव्या सांस्कृतिक दिशेला संपूर्ण मनाने पाठिंबा दिल्याचे अधोरेखित झाले.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कृष्णा यांनी स्वरांची विलक्षण मोहिनी रासिकांवर टाकली होती. त्यांना घटम्, खंजिरा, व्हायोलिन अशा वाद्यांची साथसंगत होती. त्यांच्या सादरीकरणादरम्यान पंचवटीच्या टेकड्यांवरून वाहणारा मंद वारा, त्याच्या बरोबरीने येणारा निशिगंधाचा सुगंध आणि कृष्णा यांच्या आत्मीय स्वरांनी सारा परिसर भरून गेला होता. तेजस्वी सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या सांगीतिक कार्यक्रमाच्या समरोपास हजारो तारकांनी उजळलेल्या आकाशाची अप्रतिम पार्श्वभूमी मिळाली.

पी.आया.सी. च्या कला आणि संस्कृती विभागाच्या संयोजिका आरती किर्लोस्कर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “अतिशय कृतज्ञता आणि प्रेरणेसह पलाशच्या पहिल्या आवृत्तीची सांगता झाली आहे. पलाशची कल्पना अशी होती की कलाकारांच्या सर्जनशील प्रक्रियेच्या माध्यमातून समाजात आवश्यक असलेले चिंतन आणि संवाद यांना चालना मिळावी. यंदाच्या महोत्सवाने हा उद्देश पूर्ण करून आम्हाला नव्याने प्रेरित केले. कलेच्या माध्यमातून आमच्या ध्येयाचा अधिक विस्तार आणि समृद्धी साधण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी आयोजित करावा, असा आमचा मानस आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “केंद्राच्या प्रस्थापित ‘लेफ्ट-ब्रेन’ विश्लेषणात्मक कार्याला पूरक ठरेल अशी ‘राइट-ब्रेन’ सर्जनशीलतेची ही जोड पी.आया.सी. ला अधिक सर्वसमावेशक स्वरूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्याच वर्षातील प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, आम्हाला विश्वास मिळाला आहे की नव्याने सुरू झालेला हा कला विभाग धोरण-परिवर्तनात भक्कम स्तंभ असलेल्या मुख्य संस्थेप्रमाणेच—एक विचारशील आणि उत्साही प्रजासत्ताक घडवण्याच्या दिशेने योग्य मार्गावर आहे.

महोत्सवाचे यंदाचे कलाकार – गायक आणि लेखक टी. एम. कृष्णा यावेळी म्हणाले की, “पुण्याचे श्रोते कलेचे अत्यंत जाणकार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला आणि विचार यांचा एक अनोखा संगम मला अनुभवायला मिळाला. वाढत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार होणे अतिशय गरजेचे आहे. ‘पलाश’ हे सर्वसमावेशक, खुले आणि सामूहिक समाजाचे प्रतीक आहे—ज्यात भारतीय संविधानात अधोरेखित केलेल्या बंधुत्वाच्या भावनेचे प्रतिबिंब दिसते. यामुळे संगीत आणि संवादाच्या माध्यमातून विभिन्न लोक आपापले वैचारिक मतभेद सारून एकत्र येऊ शकले आणि अंतर्मुख संवाद साधू शकले याचा मला आनंद आहे.”

‘पलाश’च्या पहिल्या वहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने कलेचे माहेघर असणाऱ्या पुण्यात अभिजात कला आणि लोकपरंपरा एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या. ज्याद्वारे कला, अस्मिता आणि सर्वसमावेशकता यांवर एक प्रगल्भ संवाद घडवून आणला गेला ज्याला प्रेक्षकांचा अनोखा प्रतिसाद लाभला.