प्रतिनिधी – मानस : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वाटाघाटी करणे म्हणजे कमजोरी किंवा शरणागती नव्हे. इराण आपल्या नागरिकांचे हक्क आणि देशाच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युद्धामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आणि पुनर्बांधणीसंदर्भातील बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. “वाटाघाटींचा उद्देश हा इराणी जनतेच्या हक्कांचे रक्षण आणि राष्ट्रीय हित जपणे हा आहे,” असे पेझेश्कियन यांनी नमूद केले.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. अमेरिकेने ६ मे रोजी इराणला १४ कलमी प्रस्ताव पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
याचवेळी इराणचे संभाव्य नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबतही महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, खतम अल-अंबिया संयुक्त लष्करी कमांडचे प्रमुख अली अब्दुल्लाही यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या वडिलांच्या मृत्यू आणि हल्ल्यात जखमी झाल्याच्या चर्चेनंतर मोजतबा खामेनी प्रथमच चर्चेत आले आहेत.
या भेटीत इराणी लष्कराची तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षण दलांच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. यात इराणी सैन्य, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स, पोलीस, सीमा सुरक्षा दल, संरक्षण मंत्रालय आणि बसिज फोर्स यांचा समावेश होता.
मोजतबा खामेनी यांनी लष्कराच्या कार्याचे कौतुक करत शत्रूविरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान आणि कतारही सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि कतारचे पंतप्रधान तसेच परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल-थानी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. या संवादात प्रदेशातील शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांचीही भेट घेतली. या बैठकीत इराण-अमेरिका संघर्ष, पाकिस्तानची मध्यस्थी आणि तणाव कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.





