पुणे, दि. 3 मार्च २०२६ : जंगलातील संरक्षित देवराया हे प्राचीन ते अर्वाचीन, पर्यावरणीय ते जीवशास्त्रीय स्वरूपाचे जतन-संवर्धन असून त्याचे शास्त्रशुद्ध मोजमाप नकाशांच्या माध्यमातून करता येते. देवराईच्या या नैसर्गिक ठेव्यातून निसर्ग व मानव संबंध यावर शाश्वत पद्धतीचा अभ्यास करणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. निमित्त होते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) भूदृश्यकला वास्तूरचनाशास्त्र (लॅण्डस्केप आर्किटेक्चर) विभागातर्फे जंगलांमधील ‘मूर्त स्वरूपातील पर्यावरणीय देवराया’ यांच्यावरील कार्यशाळेचे.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून, भूदृश्यकला वास्तूरचनाशास्त्र विभागप्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून, प्रा. अनुपमा बापट-खटावकर यांच्या नियोजनातून आणि प्रा. मुक्ता गोखले-कुलकर्णी आणि प्रा. स्नेहल मिजार यांच्या आयोजनातून ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थिनींना प्रसिद्ध लॅण्डस्केप आर्किटेक्ट प्रा. श्री नाईक, प्रसिद्ध पर्यावरण जतनतज्ज्ञ व भूतज्ज्ञ प्रा. कौस्तुभ मोघे आणि वनस्पती तज्ज्ञ प्रा. विवेक ब्रूम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत बीएनसीए भूदृश्यकला वास्तूरचना शास्त्र विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 15 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
कार्यशाळेमागील संकल्पना स्पष्ट करताना डॉ. सहस्रबुद्धे म्हणाल्या की, देवराईचे मूर्त स्वरूप असलेले पर्यावरणशास्त्र अनेक मूर्त आणि अमूर्त पैलूंमध्ये प्रकट होते. ही कार्यशाळा म्हणजे भूदृश्यकला वास्तूरचनाशास्त्राचाच सखोल अभ्यास आहे. त्यामध्ये देवराई ही एक भौतिक व वास्तविक जागा म्हणून मानव आणि निसर्ग यांच्यातील अनेक वर्षांच्या सहअस्तित्त्वाचे नाते सांगणारे गुंतागुंतीचे बहुरंगी जटिल मोझेक (नक्षीकाम) आहे. त्या रूपात नैसर्गिक, सांस्कृतिक, दृश्य, संवेदी आणि कालस्वरूप अशा विविध थरांना त्यातून मूर्त रूप देता येणे शक्य आहे.
कार्यशाळेसंबंधी माहिती सांगताना प्रा. मुक्ता कुलकर्णी म्हणाल्या की, विविध प्रकारच्या भौगोलिक, तसेच हवामानात तयार झालेल्या देवरायांचे नकाशे काढून त्यातील मोजता व न मोजता येणाऱ्या पर्यावरणीय घटकांचे मोजमाप कसे करावे हे या कार्यशाळेतून शिकवता आले. तसेच अशा प्रकारच्या मोजमापांची गरज आणि आवश्यकता यातील सहभागी तज्ज्ञांनी विशद केली.
त्या पुढे म्हणाल्या की, या अभ्यासासाठी ताम्हीणी घाटाजवळील एका देवराईचा अभ्यास करताना त्याच्या दृश्य स्वरूपाच्या आलेखातून (ग्राफीक्स) व रेखाचित्रांमधून (स्केचेस) मांडणी करायला प्रा. नाईक यांनी शिकवले. त्या आधारे त्यातील पर्यावरणीय मूल्य ओळखण्याचे प्रशिक्षणही प्रा. मोघे यांनी दिले. तर प्रा. मोघे यांनी देवरायांचा इतिहास व त्याचे जागतिक पातळीवर पर्यावरणातील महत्व विषद केले. प्रा. ब्रूम यांनी देवरायांच्या मोजमापासाठी तयार करण्यात येणाऱ्या नकाशापद्धतींच्या माध्यामातून स्थानिक वनस्पती व जैवविविधतेचे मोजणी करण्याच्या पद्धती शिकवल्या.









