पुणे – हिंदु भगिनींच्या सुरक्षेसाठी उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, मोरवाडी (पिंपरी) आणि वडगाव (मावळ) न्यायालयामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 150 हून अधिक अधिवक्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषतः महिला अधिवक्त्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एस. के. जैन यांना लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याच्या निवेदनाविषयी सांगितले असता ते लगेच स्वाक्षरी मोहीममध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या कार्यालयातील इतर अधिवक्तांनाही स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच 3 ऑक्टोबरला राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या काही अधिवक्त्यांनी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा यावा या विषयावर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कुठेही, कधीही साहाय्य लागले तर अवश्य साहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आणि सर्व राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या अधिवक्त्यांचे कौतुक करून कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयातील मोहिमेत समितीच्या 10 अधिवक्त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी ॲड. सुतावणे यांनी अनेक अधिवक्त्यांना सहभागी करून घेतले. मोरवाडी व वडगाव (मावळ) न्यायालयांमध्येही अधिवक्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या. काही अधिवक्त्यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची मागणी केली. वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव ॲड. अमोल दाभाडे यांनीही स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला.