पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. संजय ओक

पुणे: रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आरोग्य महोत्सव आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजन केले आहे. या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.

उमेश चव्हाण म्हणाले, “या संमेलनाचे अध्यक्षपद वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. संजय ओक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, यंदाचा प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ मेळघाट (जि. अमरावती) येथील पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या संमेलनात डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रमोद जोग, डॉ. प्रदीप आवटे, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यामध्ये सहभागी होणार आहेत.”

दिवसभर संमेलनामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. आरोग्य साहित्य आढावा, चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, संगीत रजनी, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन आणि स्मरणिका प्रकाशन यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फिरता दवाखाना योजनेचे उद्घाटन होणार आहे. कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांच्यासह २५ हजार पुणेकर नागरिकांची नामांकित डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध तसेच मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबीर राबवले जाणार आहे,” असे उमेश चव्हाण यांनी नमूद केले.

डॉ. संजय ओक यांनी निवडीबद्दल आनंद व्यक्त करत प्रथमच अशा पद्धतीचे पहिले आरोग्य साहित्य संमेलन पार पडत असून, संमेलनाध्यक्षपदी माझी निवड झाल्याने अधिक जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.

डॉ. संजय ओक यांच्याविषयी…

पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय ओक हे बालरोग शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपी क्षेत्रातील अग्रगण्य शल्य चिकित्सक म्हणून ओळखले जातात. २४ नोव्हेंबर १९५९ रोजी मुंबईत जन्मलेल्या डॉ. ओक यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ते सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता, तसेच केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहिले. सध्या ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबईचे कुलपती आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.

संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन…

मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, आरोग्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे आणि मिलिंद गायकवाड तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, पुणे जिल्ह्याचे मुख्य समन्वयक राजेंद्र कदम यांनी या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.