पुणे: “छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात सुशिक्षित लोक आणि राजकारणी मंडळी भोंदू महाराजांच्या चरणी लोटांगण घालतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि माताभगिनींचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती ठेचायला हव्यात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा न्यायनिवाडा व्हायला हवा,” अशी परखड भूमिका माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडली.
स्नेहशील फाउंडेशनच्या वतीने आयोजित पहिल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यप्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, सामाजिक भान जपणारी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, ‘शिवाजी कोण होता?’चे प्रकाशक प्रशांत आंबी, बालप्रबोधनकार स्वरा सुतकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकारभवनात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार, संयोजिका व स्नेहशील फाउंडेशनच्या संस्थापिका स्नेहा कांबळे-माने आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार समाज आणि राजकारणी दोघांनीही गमावला आहे. महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून समाजात दिशाभूल केली जात आहे. बागेश्वर बाबांसारख्या व्यक्तींनी इतिहासविरोधी विधाने केली, मात्र त्या वेळी व्यासपीठावरील नेत्यांनी मौन का बाळगले?” असा माझा सवाल आहे. लहान मुलींवरील अत्याचार ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची लक्षणे आहेत. समाज आणि संस्कृती दोन्ही भ्रष्ट होत चालले आहेत. नालायक समाजाचे प्रतिनिधित्व नालायक पुढारी करत आहेत. जनता शहाणी झाल्याशिवाय देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही. इतिहास संशोधन, विचारांची परंपरा आणि सत्याचा शोध यांतूनच समाज परिवर्तन शक्य आहे.”
प्राजक्ता हनमघर म्हणाल्या, “सध्या समाज एका भयाण उंबरठ्यावर उभा असून, माणुसकी आणि प्रेमाच्या मूळ भावना आपण विसरत चाललो आहोत. आज आपल्या मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ शिकवण्याची वेळ आली आहे, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. पुढील पिढीसाठी आपण कोणता समाज निर्माण करतो आहोत, हा गंभीर प्रश्न आहे. कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी हाच अशा घटनांवर उपाय आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. वाईट काळ कायम राहत नाही. मतभेद विसरून प्रेमाने एकत्र आलो, तर समाज अधिक प्रकाशमान आणि आनंदी होऊ शकतो.” पहिला पुरस्कार नेहमीच खास असतो आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मला मिळाल्याने आनंदाबरोबरच मोठी जबाबदारीही जाणवते, असेही त्यांनी सांगितले.
उमेश चव्हाण म्हणाले, “समाज परिवर्तनाच्या चळवळीत सर्व समाजघटकांना सोबत घेणे आवश्यक आहे. मराठा समाजालाही या विचारप्रवाहात सहभागी करून व्यापक सामाजिक एकता निर्माण झाली पाहिजे. चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज अनेकदा आक्रमक असतो, मात्र शांततेने आणि संयमानेही तितक्याच ताकदीने विचार मांडता येतात, हे या कार्यक्रमातून दिसून आले. कोणताही गोंधळ किंवा आरडाओरडा न करता प्रभावी संवाद साधता येतो, याचे हे उदाहरण आहे.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “परखड भूमिका मांडणाऱ्या कलाकारांना अधिक संधी मिळाव्यात. आजच्या वातावरणात तडजोड करणाऱ्यांना त्वरित संधी मिळते, मात्र समाज परिवर्तनासाठी आवाज उठवणाऱ्या कलावंतांकडे दुर्लक्ष होते. महात्म्यांची तुलना करू नये. प्रत्येक महात्मा आपल्या कार्यामुळे उत्तुंग आहे. आकाशातील नक्षत्रांप्रमाणे प्रत्येक जण आपल्या तेजाने चमकत असतो.”
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “समाजातील वाढती असहिष्णुता, अंधश्रद्धा आणि नैतिक अधःपतन चिंताजनक आहे. समाज परिवर्तनासाठी विचारांची आणि संवेदनशीलतेची जपणूक अत्यावश्यक आहे. साहित्य, कला आणि संस्कृती या केवळ मनोरंजनासाठी नसून समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यमे आहेत. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी विवेक, संवाद आणि सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे.”
डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणाले, “समाजात वाढत चाललेल्या बुवा-बाबांच्या प्रभावाला थांबवण्यासाठी व्यापक प्रबोधनाची गरज आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात आणि घराघरात अंधश्रद्धा पसरल्याची खंत वाटते. जोपर्यंत समाजात १०० टक्के बुद्धिप्रामाण्यवाद येत नाही, तोपर्यंत बुवाबाजी संपणार नाही. निर्भयपणे विचार मांडत राहणे ही आपली जबाबदारी आहे.”
दीपक केदार म्हणाले, “समाजातील मूलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण केले जात आहेत. आरक्षण, जातीयवाद आणि मीडिया ट्रायलच्या माध्यमातून खरे प्रश्न बाजूला ढकलले जातात. माणसाच्या अस्तित्वाचाच लढा सुरू आहे. गुन्हेगाराची जात नव्हे, तर त्याची प्रवृत्ती महत्त्वाची आहे. अशा प्रवृत्ती समाजाने एकत्रितपणे ठेचल्या पाहिजेत.”
अनिल हातागळे, प्रशांत आंबी, स्वरा सुतकर यांचीही विचार मांडले. स्वागत-प्रास्ताविक स्नेहा कांबळे-माने यांनी केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जीवराज चोले यांनी आभार मानले.





