बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश, तीन जण अटकेत; येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची मोठी कारवाई

By: Editor_Pratik

On: Friday, July 31, 2026 5:17 PM

Google News
Follow Us

प्रतिक गंगणे । पुणे । 7276314142

पुणे : येरवडा पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आणि देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आणलेल्या तिघा जणांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकीसह ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांनी शहरात अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव विंडे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कारवाई केली.

२८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तपास पथक येरवडा परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांना गुप्त माहिती मिळाली. चव्हाण चौकातून मुळीक फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत तीन संशयित युवक देशी बनावटीचे पिस्टल घेऊन कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

संशयित दुचाकीवरून पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांची नावे महेश अशोक कांबळे (वय २१, भुगाव), गणेश तुळशीराम पवार (वय २२, नांदेड सिटी) आणि यश चंद्रकांत उरणकर (वय २२, पाषाण) अशी आहेत. चौकशीत महेश कांबळे याने जप्त केलेले पिस्टल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचे देशी पिस्टल, ८०० रुपयांचे जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपी महेश कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी नऱ्हे पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. तसेच आरोपी गणेश पवार याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, बेकायदेशीर जमाव तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद असून, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

या आरोपींकडे शस्त्र कोठून आले, ते कोणाला विकले जाणार होते, तसेच त्यांच्या मागे आणखी कोणते गुन्हेगारी जाळे कार्यरत आहे का, याचा तपास येरवडा पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, मुकुंद कोकणे, बालाजी सोगे, शैलेश वाबळे, संदीप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now