पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन भामा आसखेड पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी जानेवारी-२०२७ चा ‘अल्टिमेटम’ महापालिका प्रशासनाला दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्धारित वेळेत प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आणि आगामी कामांची तातडीने गती मिळविण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या आहेत.
या योजेतील भामा आसखेड जलउपसा केंद्रावर काम प्रगतीवर आहे. जॅकवेल – १००% पूर्ण झाले आहे. पंप हाऊस – ७५%, सबस्टेशन – ८०%, अप्रोच ब्रिज –५% आणि विद्युत, यांत्रिकी, Instrumentation, SCADA साहित्य – १००% उपलब्ध झाले आहेत.
रावेत आणि निघोजे बंधारा प्रदूषणावर उपायोजना करा…
शहराला पाणी उपसा करणाऱ्या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत आपण विधानसभा सभागृहातही मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले आहे. पुरवठा होणारे पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची पाणी प्रक्रिया यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सेकंडरी ट्रिटमेंटनंतर आता टर्शरी ट्रिटमेंट करावी लागणार आहे. त्याठिकाणी ड्रेनेजचा वास येतो. त्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. तसेच, निगडी ऑग्युमेंन्टेशन टप्पा दोनचे काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. निगडी WTP – ४२८ MLD (१०० MLD वाढ, एकूण ५२८ MLD) कामाला गती द्यावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.
ठेकेदार बदला किंवा नवीन घ्या, पण काम वेळेतच झाले पाहिजे..!
भामा आसखेड धरण येथील अशुद्ध जलउपसा केंद्र पासून नवलाख उंबरे येथील बी.पी.टी पर्यंत १७०० मि.मी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेकेदार – मे. ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम केलेले नाही. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सदर ठेकेदाराचे काम रद्द केले आहे. नवीन निविदा काढणे किंवा न काढणे हा प्रशासनाचा अधिकार आहे. पण, या प्रकल्पाचे काम निश्चित वेळेत झाले पाहिजे. त्यासाठी संबंधित ठेकेदार याला जाचक अटी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमूद करा. भामा आसखेड प्रकल्पातून सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत ट्रायल चालू झाली पाहिजे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालू करुन जानेवारी २०२७ मध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्याहस्ते लोकार्पण झाले पाहिजे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.





