पुणे : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ हे मानवतेचे सर्वात मोठे प्रतीक असून, ते एखाद्याला नवजीवन देऊ शकते, असे प्रतिपादन किडझ किंगडम प्री-प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या वैभवी सोळंकी यांनी केले. महावीर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासते. रक्तदान हे निःस्वार्थपणे केलेले कार्य असून, एका रक्तदात्याच्या दानामुळे एकाच वेळी तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. तसेच, रक्तदानामुळे दात्याच्या आरोग्यालाही फायदे मिळतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, मानवी शरीरात निर्माण होणारे रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान हाच एकमेव पर्याय आहे. ‘रक्तदान म्हणजे केवळ रक्ताचे दान नव्हे, तर ते जीवनदान आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
दर दोन सेकंदाला कुणा ना कुणाला रक्ताची गरज भासते. रस्ते अपघात, प्रसूती, शस्त्रक्रिया तसेच थॅलेसेमिया व कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी रक्त अत्यावश्यक असते, असेही त्यांनी सांगितले.
या शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. या उपक्रमासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या ब्लड बँकेने रक्त संकलनाची सेवा उपलब्ध करून दिली. उपस्थित डॉक्टर, शिक्षक आणि पालकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी सर्व रक्तदात्यांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजतात, असेही मत व्यक्त करण्यात आले.





