Ajit Pawar vs Yugendra pawar : बारामतीचे दादा बदलणार? कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणतात…

Ajit Pawar vs Yugendra pawar : बारामतीमधल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. नणंद विरुद्ध भावजय या लढतीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं होतं. निवडणुकीसाठी संपूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरले होते. सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला. या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचे नाव फार चर्चेत होतं. युगेंद्र पवार यांनी थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याच्या चर्चा सुरु झालीय.

हेही वाचा : BIG NEWS : बॉलिवूड अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सडला मृतदेह

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान, शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या समर्थकही शरद पवारांची भेट घेतली. यावेळी युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी थेट शरद पवारांपुढे बारामतीचा दादा बदलाचाय, तुम्ही युगेंद्र पवारांना ताकद द्या, अशी मागणी केली. युगेंद्र पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी समर्थकांनी यावेळी केली. त्यावर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

“आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे,” अशी मागणी युगेंद्र समर्थकांनी शरद पवारांकडे केली.

युगेंद्र पवारांना संधी द्या, अशी मागणी समर्थकांनी केल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हातवारे करत, “उमेदवारीची चर्चा आता करु नका. यावर काय तो निर्णय लवकरच होईल. संयमी राहा,” असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्यानंतर युगेंद्र पवार यांनी विद्या प्रतिष्ठाणच्या कामात सहभाग घेतला. युगेंद्र पवार हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, शरयू उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. युगेंद्र पवार हे दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात भाग घेत असतात. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांनी विहिरी देखील खोदून दिल्या आहेत.