पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा!

By: Editor_Manas

On: Friday, June 12, 2026 4:27 PM

Google News
Follow Us

पिंपरी-चिंचवड : हिंदू धर्मातील पवित्र अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त धर्मसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि सनातन परंपरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे नेते महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा महेश लांडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

जय गणेश लॉन, मोशी येथे आयोजित या अध्यात्मिक सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तब्बल 330 अधिक ब्राह्मण दांपत्यांचे विधिवत पाद्यपूजन, लक्ष्मी-नारायण पूजन, सन्मान व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. वेदमंत्रांच्या मंगलमय घोषात आणि धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा व सनातन संस्कृतीचे दर्शन घडविले. मंचावरील श्री. विठ्ठल- रुख्मिणीची मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

अधिक मास हा हिंदू धर्मशास्त्रानुसार अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या काळात दान, धर्म, जप, तप आणि पूजनाला विशेष महत्त्व असल्याने ब्राह्मण दांपत्यांचा सन्मान करून धर्मसेवेची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या ब्राह्मण दांपत्यांना सन्मानपूर्वक आहेर प्रदान करण्यात आले.

या भव्य सोहळ्यास कला, शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, महिला प्रतिनिधी तसेच हजारो नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून धर्मसंस्कृतीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “अधिक मासाच्या निमित्ताने समाजात धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, तसेच सनातन परंपरांचा गौरव पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” तसेच, शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा लांडगे यांनीही धर्मकार्य, संस्कार संवर्धन आणि समाजप्रबोधनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. धर्म, संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरलेल्या या भव्य सोहळ्याने अधिक मासातील पुण्यपर्वाला एक विशेष अध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या लक्ष्मी-नारायण पूजन सोहळ्याच्या माध्यमातून सनातन संस्कृतीच्या जतनाचा आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026