पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्ष अंतरावर; मात्र त्यामुळे पृथ्वीचे आसमंतही उजळून जाऊ शकते

यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कधीही आकाशात तार्‍यांच्या स्फोटाची दुर्मीळ घटना पाहण्याची संधी हौशी खगोलप्रेमींना मिळू शकते. हा स्फोट होणार आहे, पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्ष अंतरावर; मात्र त्यामुळे पृथ्वीचे आसमंतही उजळून जाऊ शकते. आयुष्यात एकदाच अशी घटना पाहण्याची संधी मिळू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

कोरोना बोरियालिस या तारकापुंजात हे जुळे तारे आहेत. हे तारे इतके फिकट आहेत की, ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणे कठीण आहे; मात्र दर 80 वर्षांनी त्यांच्यामधील आण्विक स्फोट त्यांना चमकदार बनवत असतो. ‘नासा’ने म्हटले आहे की, त्यांच्यापासून येणारा प्रकाश चमकदार असतो. काही दिवसांसाठी हा प्रकाश दिसू शकतो. आता तिसर्‍यांदा हा प्रकाश पृथ्वीवरून पाहता येईल. सन 1866 मध्ये आयरिश संशोधक जॉन बिर्मिंघम यांनी सर्वप्रथम तो पाहिला होता. त्यानंतर सन 1946 मध्ये तो पाहण्यात आला.

आता तिसर्‍यांदा तो माणसाच्या नजरेत येणार आहे. सर्वसाधारणपणे असे तारे एक लाख वर्षांनंतर स्फोट दर्शवतात; मात्र काही तारे मनुष्याच्या कालगणनेच्या हिशेबाने लवकरही स्फोट दाखवतात. त्याचे कारण जुळ्या तार्‍यांमधील परस्पर असलेले संबंध. त्यापैकी एक तारा थंड आणि मृतप्राय असतो. त्याला ‘रेड जायंट स्टार’ म्हणतात. तो हायड्रोजनच्या इंधनात जळत असतो. दुसरा तारा म्हणजे ‘व्हाईट ड्वॉर्फ’. हा सफेद खुजा तारा म्हणजे एखाद्या तार्‍याची मृत्यूनंतरची अवस्था असते. हा तारा दर 227 दिवसांनी लाल तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हे दोन्ही तारे एकमेकांपासून इतके जवळ असतात की, त्यांच्यामधून सामग्रीचे उत्सर्जन होत असते. दर 80 वर्षांनी खुजा तारा उष्ण होऊन असे स्फोट होतात.