बोलोरो पिकअप वाहन बनावट क्रमांक लावून वापरात गुन्ह्याची नोंद

बोलोरो पिकअप परराज्यातील असताना संशयित चालकाने तिला बनावट नंबरप्लेट लावून वापरली. तसेच, स्वत:च्या नावावर ते वाहन केल्याचे आढळून आल्याने संशयित चालकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय शंकर लामखेडे असे संशयित चालकाचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक म्हसरुळ परिसरात गस्तीवर असताना अंमलदार सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे यांना, बोलोरो पिकअप वाहन बनावट क्रमांक लावून वापरात असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार युनिट एकच्या पथकाने म्हसरुळ येथील कन्सारा माता चौकातील पुष्कराज अपार्टमेंट येथे सदरील बोलोरो पिकअप (एमएच १५ एचएच ४९९८) आढळून आले. पथकाने पिकअपच्या मूळ चेसीस व इंजिन क्रमांकावरून माहिती घेतली असता, या पिकअप वाहनाचा क्रमांक टीएन २२ डीए ५०१४ असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, ते वाहन संशयित अक्षय शंकर लामखेडे याने त्याच्या नावावर केल्याचे आढळून आले.

संशयिताने बनावट क्रमांक लावून पिकअप वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयिताला अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, समाधान पवार यांनी बजावली.