सुरेल रागदारीतून वसंत ऋतूचे स्वागत 

पुणे :  वसंत ऋतूचे  आगमन,होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वर धरोहर’ संस्थेतर्फे आयोजित ‘स्वर बसंत’  या गानमैफलीला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शनिवार,दि.२३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात   ही मैफल आयोजित करण्यात आली होती.
डॉ.रेवा नातू आणि गौरी पाठारे यांनी या मैफिलीत सुरेल शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन सादर केले.त्यांना तबल्यावर रोहित देव आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी साथसंगत केली.अनुश्री बोधले- नातू यांनी सूत्रसंचालन केले.
 डॉ. रेवा नातू यांनी प्रारंभी राग यमन मधील ‘देहो दान मोहे ‘ही विलंबित एक तालातील बंदिश सादर केली.’ सुखदाता सदन के शंकर ‘ ही दृत बंदिश, नंतर एक तराणा सादर केला. वसंत ठकार यांनी रचलेली राग देस मधील ‘रंग उडत है चहू ओर ‘ ही  झपतालातील बंदिश, ‘चल कोकीला मधुमास आया’ ही बंदिश सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
गौरी पाठारे यांनी सुरेल गायकी द्वारे त्यांच्या खास शैलीत राग रागेश्री – झुमरा,आणि राग बसंत सादर केला. ‘आयो अत अत वारो’ ही पारंपारिक बंदिश तसेच ‘देखो शाम गेहेलिनी बैया मोरी’ , ‘पिया संग खेलो होरी ‘या बंदिशी सादर केल्या. होरीचा दादरा आणि झुला प्रभावीपणे सादर केला.
 दोन्हीं प्रतिभावान गायिकांच्या विलोभनीय सादरीकरणाला पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
स्वर धरोहर व डॉ. रेवा नातु प्रस्तुत “साधना” ह्या त्रैमासिक मालिकेतील हे पहिले पुष्प होते.
भारतीय संस्कृती मध्ये ऋतुचक्राचे प्राधान्य आहे. आपले सण सुद्धा ऋतुचक्राला अनुसरून असतात. ह्या सणांची आणि ऋतूंची शोभा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधून देखील वाढते. निसर्ग आणि सण ह्यांचे अतिशय रम्य वर्णन करणाऱ्या बंदिशी आणि उपशास्त्रीय गीत प्रकार हे आपल्या शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्यच आहे. हे वैशिष्ट्य या मैफिलीतून ठळकपणे पुढे आले.प्रवेश विनामूल्य होता.