पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी घडामोड; अवैध दारू विक्रेता राहुल क्षीरसागरचाही मृत्यू, तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

By: Editor_Manas

On: Friday, May 29, 2026 4:35 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हडपसर परिसरात अवैध दारू विक्री करणारा राहुल क्षीरसागर याचाही विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हडपसरमधील पांढरे मळा परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राहुल शरद क्षीरसागर (वय ४५) याच्यावर १३ मे रोजी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याचाच विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

हडपसरमधील मृतांची नावे

विषारी दारू प्राशनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये राहुल शरद क्षीरसागर (४५), विजय भूकुरलाल शर्मा (४५), अरुण वामन डाडर (६०), हे तिघे पांढरे मळा, हडपसर येथील रहिवासी होते. तसेच अशोक रमेश चव्हाण आणि दत्ता माधवराव सूर्यवंशी (५५) हे ससाणेनगर परिसरातील रहिवासी होते.

दारू पिल्यानंतर प्रकृती बिघडली

बुधवारी रात्री दारू सेवन केल्यानंतर संबंधितांना मळमळ, उलट्या, डोळ्यांवर अंधारी येणे तसेच तोंडाला फेस येणे अशा गंभीर तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि पुढे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृतांचा आकडा १५ पार

पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्राशनामुळे आतापर्यंत १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली असून अवैध दारू विक्रीच्या साखळीचा तपास वेगाने सुरू आहे.

तपास सीआयडीकडे जाणार?

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. विषारी दारूचा पुरवठा, वितरण साखळी आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी व्यापक चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026