समाज म्हणून इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी; ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

By: Editor_Manas

On: Monday, June 1, 2026 4:03 PM

Google News
Follow Us

पुणे: “जो समाज इतिहासाकडून शिकत नाही आणि भूतकाळातील चुका पुन्हा करतो, त्याचे भवितव्य शंकास्पद राहते. त्यामुळे भारतीय समाज म्हणून आपण इतिहासाकडून बोध घेतला पाहिजे आणि चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि प्रभावी वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. याच मनोवृत्तीमुळे तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राम मंदीराच्या उभारणीमध्ये शहीद झालेल्या कारसेवकांचे नाव आयोध्येत व इतिहासात कोरले जावे, यासाठी आपण मोहीम हाती घेऊ आणि त्याची सुरुवात बाणेर सभेमधून होतेय, याचा आनंद वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि हर घर सावरकर या संस्थांच्या वतीने आयोजित व्याख्यानात कुलश्रेष्ठ बोलत होते. बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, सावरकर विचार दर्शनचे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर, हर घर सावरकरचे गिरीश देशपांडे, ब्राह्मण सांस्कृतिक संघाचे उमेश फडके, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि सावरकर प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानात हिंदु-मुसलमान, संविधान, सेक्यूलर संकल्पना, बाबरी मशीद आणि राम मंदिर, वंदेमातरम् गीत अशा संवेदनशील मुद्यांविषयी मतप्रदर्शन केले. समाजात तथाकथित ‘बडे आदमीं’चा सुळसुळाट झाला आहे आणि त्यांचे अनुकरण वाढत आहे. हे धोकादायक असून, त्यामुळे समाजापुढील खरे आदर्श मागे पडतात. स्वातंत्र्यदिनाविषयी ते म्हणाले, १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला, असे म्हणणे योग्य नाही. त्या दिवशी फक्त सत्तेचे हस्तांतरण झाले, हे वास्तव आहे. राष्ट्रपिता म्हणवणारे फारतर या देशाचे पुत्र आहेत, पण ते देशाचे पिता कसे आणि कोणी ठरवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अहिल्यादेवी होळकरांनी श्री काशी विश्वेश्वर मंदिरातील पूजेला पुन्हा सुरवात केली, त्यामुळे वहीवाट सुरू राहिली आणि आज त्या मंदिराचे वैभव आपण पाहात आहोत. एका छोट्या पण धैर्यशाली कृतीने अहिल्यादेवींनी संस्कृतीचे प्रवाहीपण अबाधित राखले आणि आदर्श निर्माण केला. सावरकर, सुभाषबाबू, सरदार पटेल यांचीही उदाहरणे अशा कृतीशीलतेसाठी सतत समोर असली पाहिजेत.

ते पुढे म्हणाले, सावरकर त्यांच्या काळात शंभर वर्षे पुढचे काही सांगत होते, अशाच मनोवृत्तीमुळे ते समजून न घेतल्याने आजही सावरकरांचे नाव घेताना त्यांना कचरायला होते. मतदान करताना पक्ष, जात आणि फुकटेगिरी यापलीकडे जाऊन सूज्ञ विचार केला पाहिजे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि त्यापूर्वीची मोदींची मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणा समजून घेण्याची गरज आहे. आजही जग युद्धग्रस्त असताना कृतीशील मौनाचा आदर्श मोदी यांनी निर्माण केला आहे. राजनैतिक पातळीवरचे निर्णय कालांतराने कृतीत उतरतात, हेही समजून घेत अवधी दिला पाहिजे. मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी वंदेमातरम् गीताच्या वगळलेल्या ओळी, नेमकेपणाने मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयांनी आज उच्चरवात गायिल्या ऐकवल्या जात आहेत, हे चांगले आहे. धर्माचा अर्थ ते कर्तव्य असा करतात, तेव्हाच सत्ताकारण वेगळ्या दिशा पकडते, असे कुलश्रेष्ठ म्हणाले.

सात्यकी सावरकर म्हणाले, “जिहादी इस्लामींचे गंभीर संकट आपल्या उंबरठ्यावर आहे. हिंदुत्वाची जपणूक हीच आपली ओळख आहे, हे दाखविण्याची वेळ आहे. देशाच्या संविधानाला आव्हान देणार्या यंत्रणा अस्तित्वात असून, त्याविरोधात हिंदुंचे एकत्व गरजेचे आहे.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले, हिंदुत्व ही राष्ट्रीय अस्मिता असल्याचा उद्घोष सावरकरांनी केला. असाधारण धैर्य, असीम त्याग आणि जाज्ज्वल्य राष्ट्रनिष्ठा हे सावरकरांचे विषेश होते. शमिका नरवणे यांनी आभार मानले, तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now