Pune Crime : कौटुंबिक वादाचा निष्पाप बालकावर राग; नऊ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याचा आरोप
पुणे : कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची संतापजनक घटना लोहगावमधील कलवड वस्तीत घडली आहे. या प्रकारामुळे बालकाच्या तोंडाच्या आतील भागाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बालकाच्या भावजयीसह तिच्या मुंबईतील दोन नातेवाइकांविरुद्ध लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हल्याळ (वय ४८) आणि हाजी मलंग शेख (दोघे रा. कांदिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख आणि त्यांचा भाऊ लोहगावमधील कलवड वस्तीत एकत्र राहतात. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून कुटुंबात वाद सुरू होते. ३१ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास अल्ताफ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी कौटुंबिक वादाच्या रागातून सानिया हिने अल्ताफ यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
बालकाची आई जैनब यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पती अल्ताफ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर बालकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. फेव्हिक्विकमुळे बालकाच्या तोंडाच्या आतील भागाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, जैनब यांनी सानियाला या प्रकाराबाबत जाब विचारला असता, हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच सानियाचे मुंबईतील नातेवाईक रियाज हल्याळ आणि हाजी मलंग शेख यांनी ससून रुग्णालयात येऊन सानियाविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.





