गुन्हेगारांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही; वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांचा ‘सोशल मीडिया’वरही वॉच

By: Editor_Pratik

On: Wednesday, August 5, 2026 1:43 PM

Google News
Follow Us

येरवडा कारागृहाच्या भिंतीजवळ फटाके फोडून आरोपीचा वाढदिवस साजरा करणाऱ्यावर कारवाई

गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांची धडक मोहीम

पुणे : गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात येरवडा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ फटाके फोडून त्याचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी एका आरोपीला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

येरवडा कारागृहासारख्या अतिसंवेदनशील परिसरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गित्ते यांनी घेतली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावरील गुन्हेगारीबरोबरच समाजमाध्यमांच्या माध्यमातून गुन्हेगारांची प्रतिमा मोठी करण्याचा किंवा त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही येरवडा पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येरवडा कारागृह परिसरात पोलिसांकडून सतर्क गस्त सुरू होती. ४ ऑगस्ट रोजी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना, एका गुन्ह्यात पाहिजे असलेला शंकर बाळासाहेब भालके (वय १९, रा. धनकवडी, पुणे) हा पोस्ट ऑफिस चौकात येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने सापळा रचून भालके याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी कारागृहाच्या संरक्षण भिंतीलगत फटाके फोडल्याची माहिती समोर आली. फटाके फोडताना वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात आला तसेच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतकेच नव्हे, तर या प्रकाराचे चित्रीकरण करून संबंधित व्हिडीओ मित्रांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर प्रसारित करण्यात आले. कारागृहात असलेल्या आरोपीच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलिसांनी गुन्हेगारांचे समाजमाध्यमांवरील उदात्तीकरण रोखण्यावर विशेष भर दिला आहे. गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्या समर्थनार्थ व्हिडीओ तयार करणारे अथवा असे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा येरवडा पोलिसांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार पिलाणे, मुकुंद कोकणे तसेच पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदीप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 4, 2026

August 4, 2026

August 4, 2026

August 3, 2026

August 3, 2026

August 3, 2026