नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी खाद्यावरील वादावर प्रथमच सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी फक्त माझ्याबाबत बोललो होतो. सावजी खाल्यास मी महिनाभर आजारी पडेन, असे म्हटले होते. दुसऱ्यांनी सावजी खाऊ नये किंवा ते आजारी पडतील, असे मी कधीच म्हटले नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नागपुरात कोणत्या वर्षी सावजीची चव चाखल्याचाही खुलासा त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून नागपुरात हलबा समाज, कोष्टी समाज आणि सावजी व्यावसायिकांकडून तीव्र आंदोलन झाले होते.
अमरावती येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, एका कार्यक्रमात प्रश्नोत्तरांच्या सत्रात सावजीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘मी सावजी खाल्यास एक महिना आजारी पडेन’, असे मी माझ्याबाबत सांगितले होते. मात्र, इतरांनी सावजी खाऊ नये किंवा सावजीमुळे इतरही आजारी पडतील, असे मी कधीच म्हटले नव्हते.
२००८-०९ मधील अनुभव काय सांगितला?
मुंढे म्हणाले की, २००८-०९ मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना एका मित्राने त्यांना सावजी भोजनालयात नेले होते. तेथे लालसर रस्सा आणि जास्त तेल पाहून त्यांनी सुरुवातीला तिखट असल्याचे सांगत नकार दिला. मित्राच्या आग्रहाखातर त्यांनी एक घास खाल्ला; मात्र तो अतितिखट वाटल्याने ते जेवण पूर्ण न करता बाहेर पडले. हा अनुभव त्यांनी केवळ स्वतःचा असल्याचे स्पष्ट केले.
हेल्दी फूडबाबत त्यांनी काय भूमिका मांडली?
अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त म्हणून प्रत्येकाने संतुलित आणि आरोग्यदायी आहार घ्यावा, अशी भूमिका आपण मांडत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. जास्त तेलकट पदार्थ खाणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, हे सर्वसाधारण आरोग्यविषयक मत असून कोणत्याही विशिष्ट खाद्यसंस्कृतीला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावजी वाद नेमका कसा सुरू झाला?
अमरावतीतील एका कार्यक्रमात मुंढे यांनी मी सावजी खाल्यास महिनाभर आजारी पडेन, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या वक्तव्याचा अर्थ सावजी खाद्यसंस्कृतीवर टीका केल्याप्रमाणे घेतला गेल्याने नागपुरात वाद निर्माण झाला.
या वक्तव्यावर नागपुरात काय घडले?
मुंढे यांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात हलबा समाज, कोष्टी समाज तसेच सावजी भोजनालयांचे व्यावसायिक आक्रमक झाले. विविध संघटनांनी निषेध नोंदविला. मध्य नागपुरातील गोळीबार चौकात हलबा समाज बांधव आणि सावजी भोजनालयांच्या व्यावसायिकांनी आंदोलन करत नागपूरच्या सावजी ब्रँडची बदनामी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी भूमिका घेत सार्वजनिक दिलगिरीची मागणी केली.
या स्पष्टीकरणानंतर वाद शांत होणार का?
मुंढे यांनी आपल्या वक्तव्याचा हेतू केवळ स्वतःच्या प्रकृतीपुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट केले असले, तरी नागपुरातील विविध समाजसंघटना आणि सावजी व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा वाद कितपत निवळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.





