क्षणिक संतापाने लेकीचा जीव घेतला; साताऱ्यात वडिलांच्या हातून १७ वर्षीय मुलीचा…

By: Editor_Manas

On: Monday, October 5, 2026 4:05 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : सातारा शहरातील गोडोली परिसरात कौटुंबिक वादातून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव असून, तिचे वडील पुरुषोत्तम कदम यांच्यावर तिच्यावर बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आपल्या आई-वडिलांसह गोडोली परिसरातील एका वसाहतीत राहत होती. तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. आर्याच्या वर्तनावरून तसेच मोबाईल आणि दूरचित्रवाणीच्या वापरावरून घरात यापूर्वीही वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री घरात दूरचित्रवाणी पाहण्यावरून आर्याचा भावंडांसोबत वाद झाला. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि तिचा वडिलांसोबतही वाद झाला. या झटापटीदरम्यान आर्याच्या डोक्याला बॅटचा प्रहार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापतीनंतर तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशय वाढला

आर्याच्या मृत्यूनंतर सुरुवातीला घटनेबाबत वेगळी माहिती देण्यात आल्याचे समोर आले. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि चौकशीनंतर पोलिसांचा संशय बळावला. घटनास्थळी पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुरुषोत्तम कदम यांनी मुलीला बॅटने मारल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती, वादाचे कारण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास सातारा शहर पोलिस करीत आहेत.

क्षणिक संतापातून घडलेल्या या घटनेने कुटुंब हादरले असून, कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, याची ही धक्कादायक घटना ठरली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now