पदवीधर तरुणांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार

By: Editor_Manas

On: Tuesday, October 6, 2026 10:15 AM

Google News
Follow Us

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मिलिंद भरत संपगावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांसह शेकडो सहकारी व हितचिंतक उपस्थित होते. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमधील ८८ हजारांहून अधिक पदवीधर मतदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत, आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास संपगावकर यांनी व्यक्त केला.

निवडून आल्यानंतर केवळ अधिवेशनाच्या काळात किंवा निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, दर तीन महिन्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर मेळावा घेऊन त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आजचा पदवीधर तरुण बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीतील समस्या, रोजगाराचा अधिकार तसेच कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायासारख्या विविध प्रश्नांना सामोरा जात आहे. या प्रश्नांची जाण असलेल्या आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सुशिक्षित प्रतिनिधीची गरज असल्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.

“पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार,” असे आश्वासन त्यांनी दिले.

पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

शिक्षण, उद्योग, शेती, माहिती तंत्रज्ञान, सहकार, पर्यटन, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून विकसित पश्चिम महाराष्ट्राची संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार संपगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पदवीधरांसाठी आपला वचननामा जाहीर केला.

प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक साठवणूक व्यवस्था

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पादित शेतमालाची योग्य साठवणूक करता न आल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक गोदामे, शीतगृहे आणि कृषीमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याबाहेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी केवळ पुणे शहरापुरत्या मर्यादित न राहता सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संपगावकर यांनी स्पष्ट केले. या जिल्ह्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आणि विकास केंद्रे सुरू करण्यासाठी धोरणात्मक पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस भूमिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय याबाबत कठोर उपाययोजना करून पारदर्शक परीक्षा प्रणालीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.

किल्ले संवर्धनातून पर्यटन व रोजगार

पुणे पदवीधर मतदारसंघातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या रूपात विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून न पाहता, त्यांचे संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.

“पदवीधरांना सहज उपलब्ध असलेला आमदार हवा”

पदवीधर मतदारांशी संवाद साधताना विद्यमान प्रतिनिधी निवडून आल्यानंतर सहज उपलब्ध होत नसल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. ही परिस्थिती बदलून सर्वसामान्य पदवीधरांना सहज उपलब्ध असलेला आमदार म्हणून काम करणार, असा विश्वास मिलिंद संपगावकर यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now