महिलांच्या आरोग्यासाठी ‘निरोगी सखी – राहील सुखी’ : महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून शहरव्यापी आरोग्य अभियान

By: Editor_Pratik

On: Thursday, August 6, 2026 5:07 PM

Google News
Follow Us

उद्या ‘महापौर महिला आरोग्य अभियान’चा शुभारंभ; वर्षभर पुणे शहरात मोफत आरोग्य तपासणी मोहीम

पुणे, दि. _ : महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करून त्यांना नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी, विविध आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ राबविण्यात येत आहे. “निरोगी सखी – राहील सुखी” हे ब्रीदवाक्य असलेल्या या अभियानाचा शुभारंभ उद्या दांडेकर पूल परिसरातील सर्व्हे क्रमांक 130 येथील सेवावस्तीमध्ये होणार असून, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या अभियानाअंतर्गत महिलांसाठी मोफत पाच प्रकारच्या रक्त तपासण्या, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियमित आरोग्य तपासणीद्वारे संभाव्य आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रक्तातील आवश्यक घटकांची कमतरता, मधुमेह, रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार उशिरा निदर्शनास येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, या हेतूने हे अभियान संपूर्ण वर्षभर पुणे शहरातील विविध सेवावस्त्या आणि परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

“निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज” हा संदेश या अभियानाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात येणार असून, महिलांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

याबाबत महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब सक्षम, आनंदी आणि निरोगी राहते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी, रक्त तपासणी आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.”

महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहरातील सर्व महिला भगिनींना या अभियानात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले असून, हा उपक्रम महिलांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासह निरोगी समाज घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अभियानात एन.एम.ओ., अनुलोम सेवाकार्य संस्था तसेच विविध सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग राहणार असून, शहरातील अधिकाधिक महिलांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 6, 2026

August 6, 2026

August 5, 2026

August 5, 2026

August 4, 2026

August 4, 2026