पुणे: कॉस्ट अकाउंटंट्स हे आव्हानात्मक आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारे क्षेत्र आहे. त्यामुळे नीतिमूल्याची जपणूक करीत विषयाचे सखोल ज्ञान घेत या क्षेत्रातील ‘तज्ज्ञ’ होण्यास प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएमआय) पुणे चॅप्टरतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात डॉ. काळकर बोलत होते. कर्वेनगर येथील सीएमए भवनात झालेल्या समारंभावेळी जीएसटी सहआयुक्त सीएमए संजाली डायस, ‘आयसीएमआय’चे उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, विभागीय समिती सदस्य सीएमए चैतन्य मोहरीर, सीमए डॉ. संजय भार्गवे, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत ईप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, स्टुडेंट कोऑर्डीनेशन कमिटीचे चेअरमन सीएमए अमेय टिकले, खजिनदार सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए हिमांशू दवे, अनुजा दाभाडे आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, सीएमए हनुमंत जमदाडे व सीएस कल्याणी शिरोडे यांनी मार्गदर्शन केले. सीएमए सौमित्र बावठाणकर स्मरणार्थ उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना, तर पीसीसीए आर्ट सर्कल व संदीप जोशी परिवाराच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. पराग काळकर म्हणाले, “सीएमए विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून थांबू नये. कृत्रिम बुद्धिमता, नाविन्यता, नवनवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आत्मसात केले, तर तुम्हाला असंख्य संधींची दारे खुली आहेत. तंत्रज्ञान आणि एआयमुळे मूलभूत कामे यंत्रांद्वारे होत असली, तरी निर्णयक्षमता ही माणसाचीच ताकद आहे. व्यावसायिक आयुष्यात सतत रिस्किलिंग आणि अपस्किलिंग करत राहा. देशातील पायाभूत सुविधा, वित्त, प्रकल्प व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.”
सीएमए संजाली डायस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नोकऱ्या कमी करणारी नव्हे, तर नव्या संधी निर्माण करणारी परिवर्तनशील शक्ती असल्याचे स्पष्ट केले. जागतिक स्तरावर एआयमुळे रोजगारांबाबत मिश्र चित्र दिसत असले, तरी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणारे, नवे कौशल्य आत्मसात करणारे आणि बदल स्वीकारणारे व्यावसायिक भविष्यात अधिक यशस्वी ठरतील. मानवी संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि विश्लेषणक्षम विचारशक्ती हीच खरी व्यावसायिकांची ताकद असते, असे त्यांनी सांगितले.
सीएमए नीरज जोशी म्हणाले, “सीएमए प्रोफेशनल्स म्हणून काम सुरु केले, तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून सतत शिकत राहावे. संस्थेशी जोडून घ्यावे. त्यातून या व्यवसायातील नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होते. वरिष्ठांच्या अनुभवातून या क्षेत्राचे वेगळे पैलू समजतात. सेवा क्षेत्रात सीएमएना मोठी मागणी होत आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या मोठ्या संधींचा लाभ घेण्यासाठी देश-परदेशात, नोकरी-व्यवसायात जाण्याची तयारी ठेवावी.”
सीएमए चैतन्य मोहरीर व डॉ. संजय भार्गवे यांनीही मार्गदर्शन केले. सीएमए श्रीकांत ईप्पलपल्ली यांनी ‘आयसीएमएआय’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. सीएमए अमेय टिकले यांनी प्रास्ताविक केले. सीएमए राहुल चिंचोळकर यांनी स्वागत-परीचय करून दिला. तन्वी वैद्य, वैष्णवी जोशी व प्राची भुतडा यांनी सूत्रसंचालन केले.








