खऱ्या नेतृत्त्वात इतिहास बदलण्याचे सामर्थ्य असते : डॉ. सदानंद मोरे

By: Editor_Manas

On: Monday, December 29, 2025 2:33 PM

Google News
Follow Us

पुणे, दि. २९ डिसेंबर २०२५ : जो खरा मोठा नेता असतो तो इतिहास बदलतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वाने इतिहासाच्या प्रवाहाला अपेक्षित वळण दिले. त्यांनी आपल्या नेतृत्त्वामुळे तत्कालीन भारतवर्षात पसरलेली मोगलांची सत्ता रोखण्याचे महत्त्वाचे कार्य केले, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. निमित्त होते शिरीष प्रभाकर तांबे लिखित ‘नेतृत्व’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पाडलेल्या या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे,प्रमूख पाहुणे व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक अश्विन खरे आणि राजकवी भा. रा. तांबे यांचे नातू व लेखक शिरीष तांबे  उपस्थित होते.

निरजा आपटे यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. प्रकाशनानंतरच्या दुसऱ्या भागात ‘सृजनस्नेही’ संस्थेचे सुधीर मोघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्मरण राजकवींचे’ हा भा. रा. तांबे ह्यांच्या निवडक काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रम सादर झाला. त्यामध्ये मीनल गानू आणि आसावरी कुलकर्णी यांनी भाग घेतला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे पुढे म्हणाले की, नेतृत्व ही वृत्ती असून ते सारे नेते आपले मिशन हे नियती आणि इतिहासाने दिले असे समजून वागले. मुघल सम्राट औरंगजेबाला अडवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांसह छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई याच्या नेतृत्त्वाचाही मोठा वाटा आहे. त्यांनी औरंगजेबाला २५ ते ३० वर्ष झुंजवले. तर पुढे पेशवाईत थोरले बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणांवर चर्चा करताना दक्षिणेऐवजी उत्तरेकडे जाऊन तेथे मोगलांचे मूळ नष्ट करण्याचे ठरवले. ती त्यांच्या नेतृत्त्वाची पहिली चुणूक असून बाजीराव पेशवे यांनी त्यांच्यावर छत्रपती शाहू महाराजांनी टाकलेला विश्वास आपल्या कृतीतून सार्थ करून दाखवला. दुसऱ्या महायुद्धात हेच घडले असून विन्स्टन चर्चिल ॲडॉल्फ हिटलरला पुरून उरला. कारण नेता म्हणून जर हिटलरचे महत्त्व कळले तरच चर्चिलचा मोठेपणा समजेल.

राजीव बर्वे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे इतिहासाची जंत्री नाही किंवा नेतृत्वाचे गाईडही नाही. नेतृत्व करणाऱ्यांनी व तरुणांनी ते आवश्य वाचावे असे वाचनीय पुस्तक आहे.  यातील व्यक्तिमत्वांमधील साधर्म्य, जिद्द, महत्वाकांक्षा, माणूस म्हणून जडण-घडण, सामान्यांचे हित पाहण्याची व्यापक दृष्टी आणि वेगळा विचार करण्याची पद्धत अशी मुख्य तत्त्वे सखोल अभ्यासातून मांडली आहेत.

शिरीष तांबे ह्यांनी आपल्या नेतृत्व ह्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांचे नेतृत्व हे पुस्तक इतिहासावर नसून तर ज्यांनी इतिहास निर्माण केला, इतिहास घडवला त्यांच्या नेतृत्व गुणांवर आहे. नेतृत्व हे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या, मार्ग दाखवणार्‍या मशाली सारखे असते. त्यामुळे ज्या लोकांनी समाजाला मार्ग दाखवला, त्यांच्या मानसिकते मध्ये , राहणीमानात एक बदल घडवून आणला, एक दिशा दिली त्या लोकांबद्दल आहे.  नेतृत्व हे कुठल्याही पदाचे नाव नाही तर ती एक विचाराची दिशा, एक मन:स्थिती , आपल्या विचारावर ठरलेले ध्येय समाज्यामध्ये बदल घडवून आणणार्‍या, आणि त्यासाठी जोखीम घेणार्‍या वृत्तीचा एक संगम आहे.

तांबे पुढे म्हणाले की नेतृत्व ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून ती मूल्य संस्कार आणि आलेल्या अनुभवाने विकसित होत असते. काहीं मध्ये नेतृत्व गुण उपजत ही असतात. मानसशास्त्राशी संबंधित शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासांनुसार,जरी वेगवेगळ्या प्रकाराची व्यक्तिमत्त्वे आणि नेतृत्व गुण वैशिष्टय़े असतात, तरी मुख्यत्वे त्याची दोन भागात विभागणी होऊ शकते . एक परिवर्तनात्मक आणि दुसरे व्यवहारात्मक. नेतृत्वाची ही सैद्धांतिक विभागणी लक्षात घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटपर्यंत विविध नेत्यांच्या नेतृत्व गुणांचा त्यांच्या मध्ये असलेल्या दूरदृष्टीचा, जिद्दीचा, काहीतरी वेगळा विचार करण्याचा व समाजासाठी उत्तरदायित्व भावनांचा अभ्यास करून त्यांनी त्यांचे मत मांडले आहे तेव्हा हे पुस्तक चांगले वाईट याचा न्याय करणारे नाही, तर नेतृत्वाचा स्वभाव विस्तृतपणे उलगडून दाखवणारे आहे

 त्यांच्या मनोगताचा समारोप करताना त्यांनी सांगितले की सामान्यांतून बाहेर पडण्याची क्षमता विकसित करणे हे नेतृत्वाच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल आहे.

अश्विन खरे म्हणाले की, आपल्या प्रकाशन संस्थेचे हे पहिलेच पुस्तक पुण्यात प्रकाशित होत असून यातून आपण इंदौर, बृहन्महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील दुवा साधण्याचा प्रयत्न करत आहोत.

सृजनस्नेही पुणे प्रस्तुत “स्मरण राजकवींचे” या कार्यक्रमाची संहिता सुधीर मोघे यांनी लिहीली होती. त्यामध्ये भा. रा. तांबे यांच्या अनंता तुझे गोल, कुणि कोडे माझे उकलिल का, घट भरे प्रवाही, रुद्रास आवाहन, महाप्रस्थान, ते कोण या ठायि, पूर्णाहुती या कवितांचे सादरीकरण सुधीर मोघेंनी तर आसावरी कुलकर्णी यांनी बघुनि तया मज होय कसेसे, मरणांत खरोखर जग जगते,  तृणाचे पाते या कविता सादर केल्या. मीनल गानू यांनी तीनी सांजा सखे मिळाल्या, घन तमी शुक्र बघ राज्य करी, ते दूध तुझ्या त्या घटातले, नववधू प्रिया मी, जन पळभर म्हणतील, निजल्या तान्ह्या वरी माऊली, कशी काळनागिणी, मधु मागसी माझ्या आणि मावळत्या दिनकरा ही लोकप्रिय गाणी सादर केली. एकूणच या तीनही कलाकारांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026