पुण्यात अघोरी प्रकार उघड; भूत-करणीच्या नावाखाली कुटुंबाला मानसिक गुलाम बनवण्याचा प्रयत्न, दोन भोंदू भगतांविरोधात तक्रार
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंगावर शहारे आणणारा आणि संतापजनक असा अघोरी प्रकार उघडकीस आला असून, भूत-करणीच्या नावाखाली एका कुटुंबाला मानसिकदृष्ट्या जखडून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप दोन कथित भोंदू भगतांवर करण्यात आला आहे. मंदोशी आणि राजपूर येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाज अजूनही पूर्णपणे बाहेर पडलेला नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर भोंदूबाबांविरोधात कारवाईची लाट सुरू असतानाच पुण्यातील हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात किसन तळपे (मंदोशी) आणि मंगेश कारोटे (राजपूर) या दोघांविरोधात पुराव्यासह पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘भूत’ आणल्याचा दावा; कुटुंबात भीतीचे वातावरण
तक्रारीनुसार, संबंधित कुटुंबाच्या घरी ‘जागरण’च्या निमित्ताने आलेल्या या दोघांनी घरासमोर थडगे असल्याचा दावा करत सुरुवातीलाच भीतीचे वातावरण निर्माण केले. “घरात बाहेरचा ‘चेडा’ (भूत) आणून ठेवला आहे, त्याला कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी विशेष विधी करावे लागतील,” असे सांगून त्यांनी कुटुंबीयांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली आणले.
जागरणाच्या नावाखाली त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांकडून तांदूळ गोळा करून त्याचा नैवेद्य दाखवण्याचा बनाव केला. या कथित विधींमुळे भूत प्रसन्न होईल आणि कुटुंबावर संकट येणार नाही, असा खोटा समज पसरवण्यात आला.
धक्कादायक धमक्या; अपमानास्पद भाषा
या प्रकारात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, या भगतांनी कुटुंबीयांना भीतीदायक आणि प्रक्षोभक विधाने करून मानसिक छळ केला.
“एकाची पोळी भाजली जाईल, तर बाकीच्यांची करपून जाईल,” अशा शब्दांत त्यांनी थेट जीवितहानीचा इशारा दिला.
याशिवाय “पोरांना पुढे केले आणि चोरांना मागे ठेवले” अशा अपमानास्पद वक्तव्यांद्वारे कुटुंबातील सदस्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे.
संगनमताने ‘दैवी शक्ती’चा देखावा
किसन तळपे आणि मंगेश कारोटे यांनी एकमेकांशी संगनमत करून ‘उजवा-डावा प्रसाद’, ‘तांबड्या अंगाऱ्याचे’ नाटक करून स्वतःकडे काही दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण केला. यामुळे कुटुंबाचा विश्वास जिंकून त्यांना पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर पीडित कुटुंब भीती आणि मानसिक तणावाखाली असून त्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामध्ये—
- महाराष्ट्र अनिष्ट प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा
- महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१७ अंतर्गत कारवाई करावी
- व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत सायबर गुन्ह्यांतर्गत तपास करावा
- या प्रकारामागील ‘बोलावता धनी’ कोण आहे, याची सखोल चौकशी करावी
अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
परिसरात खळबळ; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
ही घटना उघड झाल्यानंतर खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भोंदू भगतांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भूत, करणी, थडगे किंवा अघोरी विधींच्या नावाखाली भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंधश्रद्धेविरोधात लढ्याची गरज अधोरेखित
या घटनेने पुन्हा एकदा समाजात अंधश्रद्धेविरोधात जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे. शिक्षण, विज्ञान आणि कायद्याच्या बळावर अशा प्रवृत्तीला आळा घालणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.




