पुणे : कल्याणीनगर मेट्रो स्थानकाजवळील नदीपात्रात रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२६) आढळून आलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटली असून, तिचे नातेवाईकही मिळून आले आहेत. नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्यामुळे महिलेच्या नातेवाईकांचा तत्काळ शोध घेण्यास मदत झाल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
कल्याणीनगर मेट्रो स्थानकाजवळील नदीपात्रात अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही केली होती. मात्र, सुरुवातीला संबंधित महिलेची ओळख पटू शकली नव्हती.
त्यामुळे येरवडा पोलिसांनी महिलेचे वर्णन, अंगावरील कपडे, दागिने तसेच शारीरिक खुणांची माहिती प्रसिद्ध करून नागरिकांना ओळख पटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे आणि इतर माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात आली.
या प्रसिद्धीनंतर महिलेच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे महिलेची ओळख पटविण्याच्या प्रयत्नांना यश आले असून तिचे नातेवाईक मिळून आले आहेत.
“आपण केलेल्या सहकार्यामुळे आणि प्रसिद्धीमुळे संबंधित महिलेच्या नातेवाईकांचा तत्काळ शोध लागण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आता महिलेच्या ओळखीबाबत सुरू असलेला शोध थांबविण्यात यावा,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.
महिलेची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे येरवडा पोलिसांनी आभार मानले आहेत.





