५० ते ५५ वर्षे वयोगटातील महिला; नागरिकांनी माहिती असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : कल्याणीनगर मेट्रो स्थानकाजवळील नदीपात्रात अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना रविवारी (दि. २ ऑगस्ट २०२६) निदर्शनास आली. संबंधित महिलेची अद्याप ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर मेट्रो स्थानकाजवळील नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही केली. मृत महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून, तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
संबंधित महिलेच्या अंगात काळ्या रंगाचा ब्लाउज आणि काळा परकर आहे. तिच्या गळ्यात सोन्यासारख्या दिसणाऱ्या धातूची चेन, कानात कर्णफुले तसेच हातात पिवळ्या धातूच्या बांगड्या आहेत. महिलेच्या शरीरावर कोणतेही गोंदण आढळून आलेले नाही.
महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी एक विशेष शारीरिक खूणही नमूद केली आहे. तिच्या दोन्ही पायांमधील अनामिका म्हणजेच चौथ्या बोटांचा आकार इतर बोटांच्या तुलनेत बारीक आहे. या वैशिष्ट्याच्या आधारे तिची ओळख पटण्यास मदत होऊ शकते.
सदर महिलेची ओळख कोणाला पटत असल्यास, ती आपल्या परिचयातील किंवा नातेवाईकांपैकी असल्याची शक्यता वाटत असल्यास अथवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत नागरिकांनी ०२०-२६६८४४५६, ९५९४६९११७७ किंवा ९६२३९३५३५० या क्रमांकांवर संपर्क साधावा. महिलेची ओळख लवकरात लवकर पटावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी केले आहे.





