Pune BJP Candidate List : पुण्यातून मोठी बातमी; भाजपच्या मातब्बर उमेदवारांची नावे समोर, बिडकरांसह टिळक–बापट–भिमाले चर्चेत; वाचा ए–बी फॉर्म मिळाल्याची चर्चेत असलेली नावे

Pune BJP Candidate List : पुण्यातून मोठी बातमी; भाजपच्या मातब्बर उमेदवारांची नावे समोर, बिडकरांसह टिळक–बापट–भिमाले चर्चेत

Pune News | पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र या निर्णायक टप्प्यावरही कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. विशेषतः Bharatiya Janata Party (भाजप) कडून रविवारी सायंकाळी उमेदवार यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना ए–बी फॉर्म देण्याची रणनीती अवलंबल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपची उमेदवार यादी कधी जाहीर होणार, यावरून तारखांचा लपंडाव सुरू होता. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अधिकृत यादी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे यावेळी भाजपकडून स्वतंत्रपणे उमेदवार यादी जाहीर केली जाणार नसल्याची चर्चा जोर धरत आहे.

भाजपकडून ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशा उमेदवारांना थेट फोन करून अर्ज दाखल करण्याचा निरोप दिला जात आहे. त्याचबरोबर पक्षातर्फे ए आणि बी फॉर्मही पोहोचवले जात आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत गणेश बिडकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांना ए–बी फॉर्म मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol यांनी याआधी भाजपची उमेदवार यादी २६ डिसेंबरला जाहीर होईल, असे सांगितले होते. त्यानंतर २८ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आता अधिकृत घोषणा न करता थेट उमेदवारांशी संपर्क साधण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजपकडून पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज गणेश बिडकर यांनी दाखल केला आहे. त्यांच्यासोबत सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे आणि योगेश मुळीक यांनीही अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. काही नेत्यांना ए–बी फॉर्म मिळाल्याची नावे चर्चेत असली तरी त्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

ए–बी फॉर्म मिळाल्याची चर्चा असलेली नावे :

स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर, राघवेंद्र मानकर, गणेश बिडकर, कल्पना बहिरट, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला गणेश यादव, विशाल धनवडे, प्राजक्ता गडाळे, पल्लवी जावळे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, योगेश मुळीक, सायली वांजळे, अर्चना पाटील, शंतनू कांबळे, सम्राट थोरात, सुजाता काकडे.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणीही स्पष्ट चित्र न उभे राहिल्याने पुण्यातील महापालिका निवडणुकीची राजकीय रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.